एका उपसरपंचाचा कारमध्येच आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या
बिड जिल्हा पुन्हा हादरला, उडाली एकच खळबळ.
बीड:-
जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंच यांचा मृतदेह त्याच्या कारमध्ये आढळून घटना समोर आली आहे. ही घटना बार्शीतील सासुरे गावात मंगळवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे. गोविंद जगन्नाथ बरगे वय 38 वर्ष रा. लुखामसला ता. गेवराई असे मयत उपसरपंचाचे नाव असून त्यांची आत्महत्या की हत्या याचे कारण अस्पष्ट असून, या घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक गोविंद जगन्नाथ बरगे हे सोमवारी खासगी कामानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावाला आपला कारने गेले होते. मंगळवार सकाळी बरगे यांचा सासुरे गाव शिवारात कारमध्ये मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहीती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. घटनेची पाहणी करीत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, गोविंद बरगे यांच्या डोक्याला पिस्टलची गोळी लागल्याची जखम आढळून आली असून, त्यांच्या कारमध्ये पिस्टल देखील निदर्शनास आल्याने बरगे यांनी गोळी मारून आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे बिड जिल्हा पुन्हा एकदा हादरला गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

