महामार्गावर पडलेला तो जीवघेणा खड्डा वाहतूक पोलीसांनी बुजवीला
आरमोरी-: महामार्गावर पडलेला तो जीवघेणा खड्डा आरमोरी पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीसांनी बुजवीत प्रवाश्यांना मोठा दिलासा दिला आहे गडचिरोली-नागपूर महामार्गावर ठाणेगाव जवळील वळणावर सततच्या पावसामुळे मोठा जीवघेणा खड्डा पडल्याने अपघाताजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनचालकांना कमालीची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आरमोरीचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने तो खड्डा बुजविला.
गडचिरोली-नागपूर महामार्गावर दिवस- रात्र वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर सुरू असते. ठाणेगाव जवळील वळणावर या महामार्गावर मागील आठवड्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे मोठा खड्डा पडला. त्यामुळे लहान तसेच मोठ्या वाहनचालकांना त्रास होत होता. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या गंभीर परिस्थिती ची वेळेवर दखल घेत आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाच्या पथकातील वाहतूक पोलिस हवालदार वाशीम पठाण, शिपाई चंदक रामटेके आणि होमगार्ड सैनिक मोरेश्वर मेश्राम यांनी तत्परता दाखवून महामार्गावर पडलेल्या त्या खड्ड्याच्या सभोवती बँरीकेट लावून स्थानिक मजुरांच्या साहाय्याने खड्डा मुरूम मातीने बुजविला. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे. यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे. आरमोरी वाहतूक पोलिसांनी दाखविलेली तत्परता व जनहिताची भावना सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिस विभागाचे आभार मानले आहेत.