गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाने एकाचा मृत्यू, जिल्ह्यातील हा आठवा बळी
गडचिरोली : जिल्ह्यात मलेरियाचे थैमान सुरूच असून धानोरा तालुक्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू मलेरियाने झाला आहे. धानोरा तालुक्याच्या सिन्सूर (मोहली) येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ जुलै रोजी शनिवारला गडचिरोली येथे घडली. कपिल नामदेव पदा वय २५ वर्षे असे मृतक युवकाचे नाव आहे. जिल्ह्यातील मलेरियाचा हा आठवा बळी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात मलेरियामुळे कोरची, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांत बळी गेले आहेत. धानोरा तालुक्यात मलेरियाची साथच सुरू असून अनेक नागरिक तापाने फणफणत आहेत. कोरची तालुक्याच्या कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १२ दिवसांत १०० मलेरियाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती डॉ. स्वप्निल चोरुडे यांनी दिली. बाधित युवक कपिल पदा याच्यावर रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन दिवस उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्याने त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे