मुख्याध्यापक पत्नीने विष देऊन शिक्षक पतीला संपविले, मृतदेह जंगलात फेकून टाकले जाळून

0
 
मुख्याध्यापक पत्नीने विष देऊन शिक्षक पतीला संपविले, मृतदेह जंगलात फेकून टाकले जाळून 




यवतमाळ:-
 शहराजवळ असलेल्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक दुष्टां ही हत्या असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत हे हत्याकांड उजागर केले आहे. त्या मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या मदतीनं आपल्या पतीला विष देऊन संपवलं आणि मृतदेह जंगलात नेऊन जाळला. पोलिसांनी या हत्याकांड मधील धक्कादायक तपशील उघडकीस आणला आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शंतून देशमुख वय 32 वर्ष असे असून निधी देशमुख असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

आरोपी पत्नी निधी देशमुख हिने फळांच्या शेकमध्ये विष मिसळून शांतनूची हत्या केली आणि दोन विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला. या प्रकरणी निधी देशमुख हिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला मदत करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पत्नीने पतीची हत्या केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळून टाकला होता. बेवारस मृतदेह सापडल्याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पोलिसांत कोणतीही बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल नव्हती. त्यामुळे हत्येचा तपास करण्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करतांना पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडले.
 वर्षभरापूर्वी मृतक शंतनू आणि आरोपी निधीचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला शंतनुच्या आई वडिलांचा विरोध होता. शंतनू आधी पासूनच व्यसनाच्या आहारी गेला होता. कुटुंबातलेही त्याच्या व्यसनामुळे त्रासले होते. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला वेगळं राहण्यास सांगितलं. त्यामुळे शंतनू पत्नीसह आई वडिलांपासून विभक्त राहायचा. सुयोग नगरला भाड्याच्या खोलीत ते दोघे राहात होते. दोघेही एकाच शाळेत शिक्षक म्हणून काम करायचे. शंतनू यवतमाळच्या सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांची पत्नी निधी देशमुख त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करायची.

लग्नानंतर काही महिन्यातच शंतनूने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. दारुमुळे दोघांत खटके उडायला लागले होते. शंतनू दारुसाठी वारंवार पत्नीकडे पैसे मागायचा आणि पैसे दिले नाही तर मारहाण करायचा. पत्नीचे काही अश्लील फोटो त्याने मोबाईल मध्ये काढून ठेवले होते. दारुसाठी पैसे न दिल्यास ते अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. याच त्रासाला कंटाळून पत्नीने त्याच्या हत्येचं टोकाचं पाऊल उचललं असावे 

 पतीला संपवण्यासाठी निधीने गुगलवर विष तयार करण्याची माहिती घेतली. त्यांनतर तिने महादेव मंदिर परिसरातून फळं आणि फुलं विकत घेतली. फळं आणि फुलांचा शेक तयार करून त्यात पॅरासीटामोलच्या जवळपास 15 गोळ्या टाकल्या. निधीने इंटरनेटच्या माध्यमातून विषारी फुलांची माहिती मिळवली होती. त्यानुसार तिने जास्तीत जास्त धोतऱ्याची फुलं घालून शेक तयार केला. तो शेक तिने दारूच्या नशेत असणाऱ्या पतीला दिला. त्यानंतर मंगळवारी म्हणजे 13 मे च्या संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास शंतनूचा मृत्यू झाला.

 आरोपी निधीने शिकवणीसाठी येत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनाही स्वतःची कर्मकहाणी सांगत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निधीने त्या विद्यार्थ्यांना तयार केलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मृतदेह गाडीवरून नेऊन जंगलात टाकला. मात्र, पोलिसांच्या भीतीने दुसऱ्या दिवशी या तिघांनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला त्यानंतर तिने शंतनू बेपत्ता असल्याचा बनाव रचला. शंतनू बेपत्ता असल्याचं दाखवण्यासाठी ती स्वतःच शंतनुला कॉल करून त्याची विचारपूस करायची. मोबाईल चालू ठेऊन तो जिवंत असल्याचं ती भासवायची. शंतनुच्या मोबाईवरून ती स्वतःला कॉल करून रिप्लाय पण करायची, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून पतीच्या मोबाईलमधून 'मी थोड्या वेळात येतो. इथेच आहे,' असे मेसेज करून ठेवले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी तिनं सगळे प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांनी नेमके धागेदोरे शोधून काढले.
 पोलिसांनी संशयित म्हणून एका मित्राची चौकशी केली. त्यावेळी 13 मे रोजी काढलेला शंतनूचा फोटो एका मित्रांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडला. "मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरवली. मित्रांच्या मोबाईलमध्ये असलेला फोटोच्या शर्टचा कलर आणि घटनास्थळी जळलेल्या अवस्थेत मृतदेहावरच्या शर्टचा कलर सारखा होता. त्यानंतर शंतनुच्या पत्नीची चौकशी केली. तेव्हा तिच्याकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तर मिळाली. चौकशीअंती आरोपी पत्नी निधी देशमुख हिला ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिली असून दारुड्या पतीपासून सुटका करण्यासाठी ही हत्या केल्याची कबुली दिली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !