७ वर्षांच्या मुलीचा जन्मदात्याने केला खून : खड्ड्यात पुरला मृतदेह
प्रतिनिधी / सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुसुर गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळीज हलवून टाकणारी घटना घडली आहे. एका निर्दयी बापाने स्वतःच्या सात वर्षांच्या चिमुरडीचा खून करून तिला घराशेजारच्या खड्ड्यात पुरून टाकल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावात उघडकीस आली. ओघसिद्ध कोठे या व्यक्तीने आपल्या सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर तिला घराजवळील बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरले. खड्ड्यावर व्यवस्थित माती टाकून पुरावा झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, या घटनेची माहिती गावात पसरली आणि खळबळ उडाली.
शुक्रवार २३ मे रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता, पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील (४२) यांना या घटनेबाबत माहिती मिळाली. ओघसिद्ध कोठे यांनी आपल्या मुलीचा खून केला असून तिला पुरले आहे, अशी माहिती मिळाल्यावर ते तात्काळ रेवणसिद्ध कोठे यांच्या वस्तीवर गेले. तिथे सरपंच रेवणसिद्ध कोठे यांचे पती मनोहर नरोटे व ग्रामस्थ मदुरा खांडेकर उपस्थित होते.
त्यानंतर मंद्रुप पोलीस ठाण्याचे हवालदार मुलाणी यांना या घटनेची कल्पना देण्यात आली. काही वेळातच पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषभ कांबळे, पंच, गावकामगार तलाठी, कोतवाल, फोटोग्राफर आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी खड्ड्याची पाहणी करून पंचनामा, व्हिडिओ शुटींग आणि फोटोग्राफी केली. सरपंच यांचे पती आणि गावातील इतर तिघांच्या मदतीने खोदकाम करण्यात आले. खोदल्यावर सात वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता आणि मातीने अंग झाकलेले होते.
मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून, तो मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र पोलिसांकडून आरोपी बापावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे