शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्कंडा (कं) फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा
आमदार साहेब गाव विकासासाठी नाही पण शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात येणार का?
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विविध भागात अपुरी बससेवा, प्रवासी निवाऱ्याचा अभाव, बससेवेअभावी दररोजची पायपीट यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींची गैरसोय सुरूच आहे.
ठिकठिकाणच्या रस्त्यावर उन्हाचे चटके, पाउस, वारा झेलत कितीतरी तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने आता लालपरीला शालेय विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील फाट्यावर बसच्या प्रतीक्षेत शालेय विद्यार्थिनींना कितीतरी तास थांबावे लागत आहे. त्यात मार्कंडा (कंन्सोबा) - मुलचेरा कडे जाणाऱ्या फाट्यावर निवारा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो आहे तर मार्कंडा कंन्सोबा येथील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आष्टी येथे बसच्या प्रतीक्षेत कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा परिषद शाळा खाजगी संस्थेचे विद्यालये व महाविद्यालय डी.एड. बी एड कॉलेज असल्याने परिसरातील १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील जवळपास २० गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे विद्यार्जन करण्यासाठी येतात. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, चंदनखेडी, मार्कंडा कंन्सोबा, लगाम सिंगनपल्ली या गावातील विद्यार्थ्यांना आष्टी
येथे जावे लागते. आष्टी मधून परत स्वगृही परत जाण्यासाठी बाजूला निवारा आहे, पण इकडे आल्लापल्ली मार्गे मार्कंडा कंन्सोबा,चौडमपल्ली, लगाम कडे परत जात असताना आष्टी या शहरात विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेमध्ये तासभराहून अधिक
काळ थांबावे लागत आहे, त्या बाजूला विद्यार्थिनीना बसण्याच्या निवारा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी बसण्यासाठी निवारा व्हावा, अशी शालेय विद्यार्थिनीच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांच्याकडून मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मागील काही काळात प्रवासी निवारा मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बांधण्यात आला आहे परंतु त्या प्रवासी निवाऱ्याची संपूर्ण दुर्दशा झाली असून बसण्यायोग्यही नाही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून
बचाव होण्यासाठी आजूबाजूच्या झाडांचा प्रवाशांना आश्रय घेऊन एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटी आली की प्रवासी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एसटी तेथून निघून गेलेली असते. उन्हाळ्यात, तर प्रवाशांना व विध्यार्थ्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एक तर मार्कंडा कंन्सोबा - मुलचेरा कडे जाणाऱ्या फाट्यावर प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी शेड उभारण्यात यावा अशीही मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी केली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे आष्टी परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी येत असतात परंतु मार्कंडा कंन्सोबा येथील गावाच्या विकासासाठी नाही पण शालेय विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेण्याकरिता वेळ मिळत नाही का? असा सवाल मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे.