रस्त्यावरील खड्डे आणि अपघातांवर जिल्हाधिकारी पंडा यांचा 'ॲक्शन प्लॅन'; दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

0
रस्त्यावरील खड्डे आणि अपघातांवर जिल्हाधिकारी पंडा यांचा 'ॲक्शन प्लॅन'; दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा



जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठकीत खड्डे दुरुस्तीपासून ते ट्रॉमा युनिटपर्यंत व्यापक उपाययोजनेवर चर्चा



गडचिरोली, दि.15 (जिमाका):  मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले असून, कामात दिरंगाई झाल्यास किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास संबंधित यंत्रणांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात श्री पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत आणि यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
खड्डेमुक्त रस्त्यांची जबाबदारी यंत्रणेची
पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर व्हायला हवी असे श्री पंडा यांनी स्पष्ट करून सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा इतर ज्या यंत्रणेच्या अखत्यारीत रस्ता येतो, त्यांनी या कामात दिरंगाई केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी निश्चितपणे संबंधित यंत्रणेवर टाकली जाईल असे त्यांनी बजावले.
शाळांसमोर स्पीडब्रेकर व माहितीफलक बंधनकारक
मुख्य रस्त्यालगत असलेल्या शाळांसमोर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीडब्रेकर आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रस्ते बांधकामातील अटी व शर्तींनुसार संबंधित कंत्राटदारांकडून स्पीडब्रेकर आणि माहितीफलक लावण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अपघातप्रवण स्थळांवर विशेष लक्ष
गेल्या एक-दोन वर्षांत अपघात घडलेल्या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात एकही अपघातप्रवण स्थळ नसल्याची माहिती बैठकीत दिल्यावर अपघातप्रवण स्थळांची निश्चिती करण्यासाठी पुन्हा संयुक्त पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गडचिरोली शहरातील मुख्य चौक तसेच आष्टी व आरमोरी येथील मुख्य चौकातील अतिक्रमणे काढून ती मोकळी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
कुरखेडा येथील पुलाचे काम ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
कुरखेडा येथील सती नदीवरील अपूर्ण पुलामुळे नागरिकांना लांबचा फेरा मारावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देत, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. या पुलाचे काम पुढील ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 
अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारांसाठी उपाययोजना
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कुरखेडा येथे मंजूर केलेल्या ट्रॉमा युनिटच्या कामाला गती देण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले. यासोबतच अहेरी, वडसा आणि आरमोरी येथेही ट्रॉमा केअर युनिट आणि ब्लड बँकेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शासनाच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कॅशलेश उपचार योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वाहतूक नियमनावर भर
बैठकीत रवीवारी आठवडी बाजाराच्या दिवशी जड ट्रक वाहतूक थांबवता येईल का, याबाबत सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, ई-रिक्षा, ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम, ओव्हरस्पीड आणि कॅमेऱ्याद्वारे स्पीड तपासून चलान पाठवणे या विषयांवरही चर्चा झाली. तसेच, जिल्हा नियोजन विकास निधीतून २०२५-२६ साठी रस्ते अपघात टाळण्यासाठी प्राथमिकता ठरवून प्रस्ताव सादर करण्यासही श्री पंडा यांनी सांगितले
 पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी धोकादायक ठिकाणी माहितीफलक आणि बॅरिकेटींग प्राधाण्याने लावण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीचे सादरीकरण निता ठाकरे आणि किरण मोरे यांनी केले.
 या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता साखरवाडे, सहायक परिवहन अधिकारी अशोक जाधव, उपअभियंता सुमित मुंदडा, तसेच सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद बांधकाम आणि वाहतूक पोलिस आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !