वरोरा : वडीलोपार्जीत शेती विकल्यानंतर मला रक्कम का दिली नाही म्हणून मुलाने जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने वार करुण खुन केला. ही थरारक घटना वरोरा तालुक्यातील शेगावात शनिवारी (दि. १९) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. गुलाब पत्रुजी दातारकर (६५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा अभय गुलाब दातारकर (३५) याला अटक केली आहे.
शेगाव येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील गुलाब दातारकर हे पत्नी आणि आरोपी मुलगा अभय व त्याच्या कुटुंबासह राहत होते. एक मुलगा वायगावात राहतो. वडिलांनी काही वर्षापूर्वी शेती विकली होती. त्यातील काही रक्कम अभयला दिली नाही. या पैशावरून आई-वडिलांसोबत नेहमी वाद घालायचा. काही दिवसांपूर्वी त्याने वडिलांनामारहाण केली होती. शनिवारी (दि. १९) सकाळपासून बाप व मुलामध्ये रकमेवरून भांडण सुरू झाले. दरम्यान, मुलाने वडिलांच्या डोक्यावर कुन्हाडीने वार केला. या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आई इंदू गुलाब दातारकर हिच्या तक्रारीवरून अभयला पोलिसांनी अटक केली.

