सुभाषग्राम ३ नंबर (गुंडापल्ली) सर्कलमध्ये अवैध धंद्यांना कुणाचे अभय? दलाला मार्फत चिरीमिरीत गुंतले काय अधिकारी ?
'विकासपुरुष' दलाल व्यक्तीमार्फत अवैध धंदेवाल्यांकडून वसुली होत असल्याची खमंग चर्चा
ती महिला अधिकारी कोण याचा वरीष्ठ अधिकारी शोध घेणार काय?
आष्टी ( अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येत असलेल्या सुभाषग्राम ३नंबर (गुंडापल्ली) सर्कल परिसरात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा सध्या जोरत सुरू आहे. या अवैध धंद्यांना काही व्यक्तींचे पाठबळ मिळत असून, ‘विकासपुरुष’ व्यक्ती अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करून ती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत असल्याची चर्चा परिसरात खमंग रंगली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गुंडापल्ली सर्कलमध्ये अवैध दारू विक्री, गौण खनिज उत्खनन व इतर अवैध व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे दिसून येत असून, संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारामुळे शासनाचा कर बुडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिसरातील नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अवैध धंद्यांना संरक्षण कोण देत आहे, वसुली करणारी व्यक्ती कोण आहे, तसेच या कथित वसुलीचा लाभ कोणाला मिळत आहे, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वस्तुस्थिती समोर आणावी व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौकशीनंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे मतही सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

