आष्टी येथील नदीतिरावर स्मशान भूमीची निर्मिती करण्यात यावी.-- प्रा. डॉ. भारत पांडे
आष्टी (अशोक खंडारे ):- गाव तिथे स्मशानभूमी या योजनेपासून आष्टी गाव वंचित असून आष्टी येथे आधुनिक पद्धतीने स्मशान भूमीची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी प्रा. डॉ. भारत पांडे ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे सचिव कार्यालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देवून लेखी पत्राद्वारे केलेली आहे. गाव तिथे स्मशान भूमी ही महाराष्ट्र सरकारची योजना असून गडचिरोली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असणारे आष्टी हे गाव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असून असे मध्यवर्ती असणारे गाव शासनाच्या गाव तिथे स्मशान भूमी या योजनेपासून वंचित आहे. आष्टीच्या वैनगंगा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी, मार्कंडा(कंसोब ),तारसा,राळापेट, विठ्ठलवाडा, गोंडपिपरी परिसरातील इतर गावांतील जनता अंत्यविधी करीता वैनगंगा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर येतात. स्मशान भूमीची व्यवस्था नसल्यामुळे नदीच्या खुल्या जागेवर पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी पार पाडत असतात. परंतु कधीकधी निसर्गाने धोका दिल्यास भर पावसात किंवा भरउन्हामध्ये अंत्यविधी पार पाडावे लागते आहे. किंवा प्रेत हे दूरच्या गावावरून येत असल्यास किंवा पोलीस केस,पोस्टमार्टम अशा विविध शासकीय कारणामुळे प्रेत उशिरा आल्यास रात्री अंधारामध्ये किंवा गाडीच्या अथवा मोबाईलच्या प्रकाशात शव दहण करावे लागते ऊन, थंडी, पाऊस ,वादळ-वारा,रात्र किंवा अचानक पाऊस आल्यास प्रेताजवळ कोणीही थांबत नाही. केवळ नातेवाईकांना थांबावे लागते. आज सुरजागड आणि लॉयड मेटल कोनसरी व भविष्यात या व्यवसायात संबंधित अनेक व्यवसाय या परिसरात येत असून सध्यातरी दिवसरात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे नदीकडे प्रेत नेतांना अनेक अडचणींवर मात करावी लागते आहे कधी कधी तर अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होते. त्यामुळे सर्वांगीण बाबीचा विचार करून शासनाने गाव तिथे स्मशानभूमी या योजनेद्वारे नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आधुनिक पद्धतीची स्मशान भूमीची निर्मिती करावी ज्या स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था, येणाऱ्या पाहुण्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नदीखाली उतरण्याकरिता पायऱ्या, अंत्यविधी करताना धार्मिक विधी पार पाडण्यासाठी बसण्याची व्यवस्था, सभोताल सावलीची व्यवस्था व भविष्यात लाकूड मिळणार नाही म्हणून आधुनिक पद्धतीची प्रेत जाडण्याची मशीन अशा विविध बाबीचा विचार करून शासनाने आष्टीच्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर स्मशान भूमीची व्यवस्था करावी अशी मागणी पत्राद्वारे प्रा. डॉ भारत पांडे ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी केलेली आहे.

