नवजात मुलीला पाहून स्वगावी जात असताना कुनघाडा फाट्यावर ट्रकने दिली दुचाकीला धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गडचिरोली :- चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुणघाडा फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संजू मालू कारसामी (वय ३०, रा. भामरागड) हे आपल्या नवजात मुलीला गडचिरोली रुग्णालयात पाहून स्वगावी जात असताना त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकी ट्रकखाली घुसली आणि संजू कारसामी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत.
याच कुनघाडा फाट्यावर बरेच अपघात होऊन काही लोकांना जीव गमवावे लागले आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे

