शेतशिवारात धानरोपन करीत असताना वीज कोसळून ६ महिला जखमी
वैनगंगा वार्ता /ता. प्रतिनिधी श्रीकृष्ण गावडे
गडचिरोली:-
शेतशिवारात धानरोपन करीत असताना अचानक विज कोसळून सहा महीला जखमी झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर परिसरामध्ये घडली या महिलांवर देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि. 19) सकाळी त्यांना सुट्टी देण्यात आली. जखमी झालेल्या महिलांमध्ये प्रतिभा प्रल्हाद सहारे, आरती विलास सहारे, नेहा विलास सहारे, अनिता अनिल धोंडणे, प्रिया सुभाष वालदे यांचा समावेश असून; या सर्व महिला शंकरपूर येथील रहिवासी आहेत.
सध्या या सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. शंकरपूर येथील शेतकरी प्रल्हाद सहारे यांच्या शेतातील धान पिकाची रोवणी सुरू आहे. त्यांच्याच कुटुंबातील 3 महिला, तसेच घराजवळील 3 महिला मजूर रोवणी करत होत्या. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता अचानक आभाळ दाटून आले. सर्वत्र काळोख पसरला आणि विजांचा भयावह कडकडाट सुरू झाला. याचवेळी महिलांच्या सभोवताल विजांचा कडकडाट झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने एक महिला चिखलात पडली. तिला तत्काळ विसोरा येथील खाजगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. उरलेल्या महिलांनाही त्यावेळी फार काही जाणवले नाही. मात्र घरी आल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. ही बाब लक्षात येताच त्यांना देसाईगंज येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या महिलांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर शनिवारी त्या सर्व 6 महिलांना सुट्टी देण्यात आली आहे

