नराधम सासऱ्याने पत्नी व मुलीदेखत केला सुनेचा विनयभंग
मूल: -
नराधम सासऱ्याने स्वतःची पोटची मुलगी, पत्नीच्या डोळ्यादेखत सुनेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना मूल तालुक्यातील एका गावात २५ जुलै रोजी उघडकीस आली. सुनेच्या तक्रारीवरून सासऱ्याला मूल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला शनिवारी मूल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
२४ जुलै रोजी सकाळी सून रोवणीच्या कामाला शेतात गेली. दुपारी २ वाजता रोवनीवरून घरी परत आली. दरम्यान आरोपी सासरा गावातून फिरून घरी आल्यानंतर सुनेला अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. मुलीने त्याला हटकले, तरीही तो शिवीगाळ करतच होता. दरम्यान सायंकाळी ५ वाजता पीडितेची सासू घरी आल्यानंतर तिने पतीला समज दिली असता, त्याने तिलाही शिवीगाळ केली व घराबाहेर निघून गेला.
मात्र रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा घरी परत आला आणि सुनेच्या खोलीचा दरवाजा खटखटू लागला. मात्र, सुनेने दरवाजा काढण्यास नकार दिला. दरवाजा काढ अन्यथा दरवाजा तोडून टाकेन म्हणून धमकी दिली. त्याच्या भीतीने सुनेने दरवाजा उघडला. सुनेजवळ झोपून असलेल्या स्वतःच्या मुलीला इथून जा म्हणून त्याने खोलीबाहेर काढले आणि सुनेचा विनयभंग केला.
सून, सासू व नणंद यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मूल पोलिसात याबाबतची तक्रार दिली. तक्रारीनुसार मूल पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरुद्ध बीएनस ७५, २ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय वर्षा नैताम करीत आहेत. अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरातील जनतेनी केली आहे

