आष्टी चौकात एसटी बसला बोरवेल वाहनाची धडक; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची नागरिकांची मागणी

0
आष्टी चौकात एसटी बसला  बोरवेल वाहनाची धडक; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची नागरिकांची मागणी


आष्टी | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात रविवारी (दि. २२ जून) सायंकाळी सुमारे ७.३० वाजताचे सुमारास नागपूर–एटापल्ली ही एस टी  एमएच-१४ बीपी-४८२५ क्रमांकाच्या महामंडळाच्या बसला बोअरवेलची ट्रक क्र केएल-०१ एमएल-६९५५ क्रमांकाचे वाहन यांनी धडक देऊन भर  चौकात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे आष्टी शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने आष्टीच्या मुख्य चौकातून जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.
विशेष म्हणजे, आष्टी चौकात काही दिवसांपूर्वीच अत्याधुनिक वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, सिग्नल सुरू असतानाही चौकात नियमित वाहतूक पोलीस तैनात नसल्याने अनेक वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अशा प्रकारच्या अपघातांच्या घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सिग्नल व्यवस्था नवीन असल्यामुळे अनेक वाहनचालकांना अद्याप त्याची पूर्ण माहिती व सवय झालेली नाही. त्यामुळे किमान काही दिवस तरी या चौकात वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करून वाहनचालकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र  वाहतूक पोलीस हे कुठे फिरतात व कुठं राहतात हे कळायला मार्ग दिसत नाही वाहतूक पोलीस जर ज्या ठिकाणी वर्दळ असते त्याठिकाणी राहिले तर  अपघातांना आळा बसण्यास मदत होईल आणि वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होईल.
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरातील नागरिकांनी संबंधित प्रशासन व पोलीस विभागाने तातडीने दखल घेऊन मुख्य चौकात नियमित वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी जोरदार मागणी केली आहे. नागरिकांच्या या मागणीकडे प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !