वट्रा खुर्द येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे परिसरातील समस्याग्रस्त नागरिकांची मागणी

0
वट्रा खुर्द येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे परिसरातील समस्याग्रस्त नागरिकांची मागणी 



पावसाळ्यात २० ते ३० गावांचा तुटतो संपर्क 


 सिरोंचा : -
 वट्रा खुर्द येथे मोठ्या पुलियाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील समस्याग्रस्त नागरिकांनी केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका हा अत्यंत दुर्गम आणि आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. अशातच अहेरी - देवलमरी - वेंकटापूर - मोयाबिनपेठा - सिरोंचा मार्गावर असलेल्या वट्रा खुर्द येथील लहान पूल हा दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांच्या गंभीर समस्येचे कारण ठरतो आहे.

पावसाळ्यात या पुलावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाह होतो. परिणामी, १ ते २ महिने या मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद होते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या जवळपास २० ते ३० गावांतील लोकांचा संपर्क या काळात पूर्णतः तुटतो.

या काळात अन्न, औषधोपचार, शिक्षण, दळणवळण, आणि रुग्णसेवांसारख्या अत्यावश्यक सेवा पूर्णतः ठप्प होतात.

गर्भवती महिलांची रुग्णालयात ने-आण, विद्यार्थ्यांची शाळा - महाविद्यालये गाठण्याची दगदग, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा वेळेत मिळण्यात येणारा अडथळा यामुळे नागरिकांचे जीवनमान अक्षरशः अडचणीत येते. पावसाळा म्हणजे या भागातील गावकरी जणू कैद झाल्यासारखे जीवन जगतात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक पातळीवर या समस्येच्या कायमस्वरूपी निवारणासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे उंच आणि मजबूत पुलाची मागणी करण्यात आली. मात्र ती मागणी अजूनही केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष कृतीचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर टेकडा ताला येथील डॉ. सुधीर किसन मुडुमडिगेला, मोयाबिनपेठा येथील प्रभाकर परपटलावर, आणि नरसिंहपल्ली येथील राम वेकन्ना अग्गुवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांना निवेदन सादर करून वट्रा खुर्द येथे उंच आणि टिकाऊ पुलाची तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, विद्यमान पूल फारच कमी उंचीचा असून तो अल्प पावसातही जलमय होतो. परिणामी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प होते आणि गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होते.

आम्हाला विकासाच्या गाजरगप्पा नकोत, जीवन जगण्यासाठी किमान मूलभूत सुविधा हव्यात, असा संतापजनक सूर अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर वट्रा खुर्द येथे उंच आणि मजबूत पुलाचे काम तातडीने मंजूर करून नागरिकांना मूलभूत हक्क मिळवून द्यावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने या दीर्घकालीन मागणीचा सारासार विचार करून लवकरात लवकर काम पुर्णत्वास  नेण्यास सहकार्य करावे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !