"धर्मांतर" ऐतिहासिक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी - जेष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर
नागपूर:-
'धर्मांतरानंतर समाजात फार मोठे सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तन घडून आले. 'धर्मांतर' ही कादंबरी या परिवर्तनाचे विविध पैलू व तत्कालीन स्थित्यंतराचे ऐतिहासिक वास्तव यांचा वेध घेणारी कादंबरी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी केले.
रविवार, 12 नोव्हेंबरला कामठी मार्गावरील सिध्दार्थनगर येथील बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात नरेंद्र शेलार लिखीत 'धर्मांतर'या कादंबरीवर सम्यक चचेंचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते चचेंच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. रातुम नागपूर विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे, पाली भाषातज्ज्ञ प्रा. डॉ.सविता कांबळे यावेळी वक्ते म्हणून लाभले होते. खांडेकर म्हणाले, कादंबरीतील भावविश्व हा सामुहिक विचार आहे. कादंबरीतील प्रत्येक पात्र हे आपली जबाबदारी आणि कर्तव्यासह असलेल्या अधिकाराबद्दल जागरूकता प्रदशिंत करीत आहे. ही कादंबरी मुक्त इतिहास नव्हे तर ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. खऱे साहित्य हे कलात्मक असते. त्यात कसोटया निर्माण कराव्या लागतात. मात्र, आज वैचारिक विश्वात आणि कलेच्या क्षेत्रातही पळवापळवी सुरू झाली आहे. त्यामुळे क्षमतेचा पुरेपूर वापर होणे आवश्यक आहे. या दस्ताऐवजातून मनोवृत्ती निर्माण झाल्या, त्याचे चित्रण आहे. परंतु, आता क्रिएटिव्ह साहित्य हेतूपुरस्सर निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, धर्मांतर कादंबरी उत्तर नागपूरच्या स्थित्यंतराचा पट आहे. कादंबरीची दृष्टी महत्वाची आहे. येथे सांस्कृतिक व मानसिक बदलाची प्रक्रिया गांभीर्याने व तटस्थपणे मांडली आहे. या कलाकृतीत संवाद व चर्चेला आव्हान देणारे अनेक आवाज उमटलेले दिसतात. हे कादंबरीचे वैशिष्ट्य महत्वपूर्ण आहे. आहेत. ऐतिहासीक दस्ताऐवजाची सत्यान्वेशी मांडणारी ही कादंबरी आहे. कादंबरीतील स्त्रीशक्तीचे महत्वही पटवून देणारे आहे. दलित, आंबेडकरी कादंबरीतील दु:खाचा उहापोह येथे केला गेला आहे. धर्मांतरामुळे पुर्वायुष्य जीवनात आमुलाग्र बदलाचे वेध घेणे महत्वाचे आहे.नरेंद्र शेलार यांच्या कादंबरीत या क्रांतिकारक बदलाची नागपूर शहराच्या भौगोलिक अवकाशात उघडलेल्या सामाजिक परीवेषाची मनोवेधक प्रसंग आणि घटनांना अधोरेखीत करीत, त्यातील ताण तणावाच्या वास्तवाची सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ मांडणी केली आहे. आंबेडकरवादी वाङमयीन विश्वात धर्मांतराच्या एका नव्या विषयाला व्यक्त करण्याचा हा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मत डॉ. लेंडे यांनी व्यक्त केले.प्रा. डॉ. सविता कांबळे म्हणाल्या,कादंबरीत वेदना मांडल्या गेल्या आहेत. शोषणाच्या संवेदना टिपल्या गेल्या आहेत. धर्मांतरानंतर विचाराला पुढे घेऊन आंबेडकरी समाज कसा पुढे जाते हे दर्शविले गेले आहे. यातील भाषा ह्दयाला स्पर्श करणारी आहे. आंबेडकरी समाजाची प्रगती, राजकिय समिक्षेचा लेखाजोखा यात आहे. प्रारंभी कादंबरीकार नरेंद्र शेलार यांनी कादंबरीबाबत भूमिका मांडली. संचालन ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनी केले. आभार भीमराव वैद्य यांनी मानले. चर्चा ऐकण्यासाठी निळकांत कुलसंगे, कारा वालदेकर, बबन चहांदे, नरेश वाहाणे,प्रा. डॉ. विनोंद डोंगरे, अमन सोनटक्के, भाऊराव बोरकर, प्रसेनजीत गायकवाड, प्रकाश बंसोड, राजन वाघमारे, भास्कर सोनटक्के, राहूल दहिकर, मनोज शेंडे, सुमेध कांबळे यांच्यासह मोठया संख्येत साहित्य वर्तुळातील व चळवळीतील कार्यकतें उपस्थित होते.
......

