विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करणे हा यामागचा उद्देश- मुख्याध्यापक कृष्णमुर्ती गादे
आष्टी:- भारतीय वैज्ञानिक तथा इस्रोचे माजी अध्यक्ष प्रा. सतीश धवन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 25 सप्टेंबर रोजी लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल आष्टी येथे शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. कृष्णमुर्ती गादे व सचिव श्री. रमेश आरे यांचे हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबरोबर कुतूहल निर्माण व्हावे, त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळावी या हेतूने शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे ५५ प्रकल्प सादर केले. या विज्ञान प्रदर्शनीचे मुल्यमापन श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. सचिन मुरकुटे व सहाय्यक प्राध्यापिका मिस. जया रोकडे यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनीमध्ये तीन गटात मुल्यांकन करण्यात आले असून प्राथमिक गटात प्रथम कु. सारा सिद्धिकी, द्वितीय कु. कल्याणी खोब्रागडे तर तृतीय निशांत पडोळे तसेच उच्च प्राथमिक गटात प्रथम कु. स्वरा लाकडे, द्वितीय दुष्यंत गभने, तर तृतीय कु. सृष्टी इंगोले तसेच माध्यमिक गटात प्रथम कु. गुंजन पांडे, द्वितीय कु. प्रिन्सी गाडगे तर तृतीय कु. संजीवनी नागरगोजे यांनी क्रमांक पटकाविला. सदर विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, सचिव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

