अवैध मुरुम तस्कराकडून लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
वडधा कार्यालयात लावला सापळा
प्रविण तिवाडे/ कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता २९
गडचिरोली :-
वडधा साझ्यातील मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून 15 हजारांपैकी 12 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारला रंगेहात पकडले. ही कारवाई 14 ऑगस्ट रोजी वडधा येथे करण्यात आली.
रमेश महागू कवडो (32 वर्षे) तलाठी साजा क्रमांक 15 वडधा मंडळ कार्यालय देऊळगाव तालुका आरमोरी, असे लाच प्रकरणात अडकलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणात तक्रारदाराच्या मालकीचे ट्रॅक्टर डार्ली येथील खाणीतून मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना आरोपी तलाठी रमेश कवडो याने ट्रॅक्टर पकडून पंचनामा करून सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 15 हजार रुपयांची मागणी केली. परंतू तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. एसीबीने सापळा रचला. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी तलाठी कवडो याच्याच कक्षात तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपी कवडो याच्याविरोधात आरमोरी पोलीस
ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलिस हवालदार नत्थू, धोटे,आदींनी केली.
वडधा साजाचे तलाठी कवडो हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आरमोरी येथील ताइवान नगरच्या त्यांच्या भाड्याच्या खोलीत एसीबीच्या चमूकडून झडती घेण्यात आली.
मात्र अवैध मुरुम तस्करी प्रकरणी ट्राक्टर मालकावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

