वनाधिकाऱ्याच्या धाडीत लाखोंचा अवैध मुद्देमाल जप्त तर क्षेत्रसहाय्यक निलंबित

0

वनाधिकाऱ्याच्या धाडीत लाखोंचा अवैध मुद्देमाल जप्त तर क्षेत्रसहाय्यक निलंबित 


-क्षेत्रसहाय्यकाच्या संगनमतानेच सुरु होता गोरखधंदा

 सिरोंचा :-
 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
वनक्षेत्र असल्याने या वनात उत्कृष्ट सागवान उपलब्ध आहे.
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रात एकाचवेळी 19 फर्निचर दुकानांवर धाड टाकून वनविभागाने झाडाझडती घेतली असता तब्बल 9 दुकानांमध्ये सुमारे साडेसात लाखांचे दुर्मिळ व मौल्यवान सागवान अवैधरीत्या आढळून आल्याने जप्त करण्यात आले. हा गोरखधंदा क्षेत्रसहाय्यकाच्या संगनमतानेच सुरु असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याने तडकाफडकी क्षेत्र सहायक कादीर शेखला निलंबित करण्यात आल्याचेही कळते, तर याप्रकरणी फर्निचर दुकानदारांवर गुन्हा दाखल करून सर्व दुकानदारांचा फर्निचर दुकानाचा परवाना 23 जून रोजीपासून कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. सदर कारवाईने फर्निचर दुकानदार तसेच वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा कंबलपेठा या गावांत 19 फर्निचर दुकाने असून वनविभागातील वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करुन 23 जून रोजी एकाचवेळी छापे टाकले असता 8 दुकानांमध्ये दुर्मिळ सागवान लाकडे व फर्निचर तयार करण्यासाठी कापून ठेवलेल्या फळ्या असा लाखोंचा मुद्देमाल आढळून आल्याने सदर मुद्देमाल आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट झाल्यावर दुकानदारांची कसून चौकशी केली. दरम्यान हि सागवान तस्करी क्षेत्रसहाय्यक कादीर शेख याच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचे उघड झाल्याने उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी पी.डी. बुधनवर, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.झाडे यांनी कारवाई करत क्षेत्र सहायक कादीर शेखला तडकाफडकी निलंबित केले. तसेच याप्रकरणी किशोर शंकर कोरटला, देवेंद्र लच्चन्ना गोत्चुरी, राजेंद्र अंकना गोचुरी तिघे रा. रा.जंगलपल्ली, संतोष साबय्या गोत्तरी, राजकुमार समय्या पोटे, समय्या पोचालू गप्पा, रवींद्र मीनाबाबू कासोजी, सर्व रा. आसरअल्ली, सुरेश चंद्रय्या अरिंदा रा. अंकिसा यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हा नोंद करण्यात करुन त्यांच्याकडील एकूण सात लाख 51 हजार 594 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या कारवाईत बेवारस 34 हजार 311 रुपयांचे सागवान देखील आढळून आल्याने एकूण सात लाख 85 हजार 905 रुपयांचा हा सर्व मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला व त्या फर्निचर दुकानदारांचा फर्निचर दुकानाचा परवाना 23 जून रोजीपासून कायमस्वरुपी
रद्द केल्याची माहिती उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दिली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !