खाकीच्या मदतीने श्रमदानातून साकारले क्रिकेटचे मैदान
बामणी पोलिस ठाण्याचा पुढाकार
संपादक वैनगंगा वार्ता
अशोक खंडारे
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या बामणी, ग्लासफोर्डपेठा येथील क्रिकेट खेळाडूंसाठी मैदान नसल्याने खेळांडूना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब हेरुन बामणी उपपोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या मदतीने श्रमदानातून क्रिकेटचे मैदान साकारल्या गेले. यामुळे या परिसरातील किक्रेटपट्टूमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील युवांमध्ये क्रीडा कौशल्याची कमतरता नसली तरी पुरेसे व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने या भागातील खेळाडू मागे पडत चालले आहेत. या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा पोलिस दल नेहमीच अग्रेसर राहिली आहे. बामणी उपपोलिस ठाणे हद्दीतील बामणी व ग्लासफोर्डपेठा येथील क्रिकेटपट्टूना पुरेसे मैदान उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. सदर खेळाडूंनी बामणी पोलिस अधिका-यांसमोर मैदानासह पीच उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. युवकांच्या या मागणीला प्रतिसाद देत बामणी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मदन मस्के, पोलिस उपनिरीक्षक दिपक पारधे, पोउपनि संभाजी मुंडे यांनी क्रिकेट मैदानासह पीच बनविण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी स्वखर्चाने तसेच श्रमदान करीत खेळाडूंकरिता क्रिकेटचे मैदान साकारले. प्रत्यक्ष मैदान साकारल्याने क्रिकेटपट्टूंनी पोलिस दलाचे विशेष आभार मानले आहे. याकरिता उपपोलिस ठाणे बामणीचे अधिकारी व सर्व अमंलदार तसेच एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

