पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका किराणा व्यवसायीकास दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रयत्न
गडचिरोली येथील घटना
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्हा शहरातील पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असतांनाच राम मंदिरासमोरील स्वागत प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये भरदिवसा चाकूसदृश शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५ जून) दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ही घटना शहर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी दुकान मालकाने गडचिरोली पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळपासून ते राम मंदिरासमोरील स्वागत प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये पोलीस आपल्या कर्तव्यावर ठाम मांडून होते. काल दि २५ जून दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास तोंडावर दुपट्टा बांधलेला एक अनोळखी युवक दुकानाबाहेर संशयास्पदरीत्या मोबाईल पाहत उभा होता. सुमारे दुपारी १ वाजता तो युवक दुकानात शिरला. त्याने हातातील पिशवीतून चाकूसारखी धारदार वस्तू काढून थेट काउंटरवर बसलेल्या संचालकांच्या गळ्यावर लावली आणि काउंटरमधील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत संचालकाने त्या युवकाच्या चेहऱ्यावरील दुपट्टा खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान चाकूसदृश वस्तूमुळे संचालकाच्या गळ्यावर किरकोळ खरचटल्याची दुखापत झाली. प्रतिकार होत असल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
तक्रारीत आरोपीचे वर्णनही देण्यात आले आहे. तो सडपातळ बांध्याचा, अंदाजे साडेपाच फूट उंच, वय २५ ते ३० वर्षे असून त्याने पांढऱ्या-हिरव्या रंगाच्या उभ्या पट्ट्यांचा पूर्ण बाह्यांचा शर्ट, काळसर रंगाची पॅन्ट, काळा गॉगल तसेच चेहऱ्यावर दुपट्टा बांधला होता.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१२ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
ही घटना शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात आणि भरदिवसा घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोलीसारख्या तुलनेने शांत शहरात अशा प्रकारे शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीचा प्रयत्न झाल्याने शहरात गुन्हेगारी वाढत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत सुदैवाने दुकान मालकाने धैर्याने प्रतिकार केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अन्यथा ही घटना गंभीर स्वरूप धारण करू शकली असती, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीदारांचे जाळे तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध वेगाने घेतला जात असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
शहरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीप्रमाणेच दिवसा देखील गस्त वाढवावी, प्रमुख व्यापारी भागांमध्ये सुरक्षा अधिक कडक करावी आणि अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंध घालावा, अशी मागणी केली आहे.

