पोस्टे सिरोंचा येथे पोलीस दादाला खिडकी अंतर्गत विविध उपक्रम
गरजू लाभार्थी यांना ब्लान्केट, व प्रमाणपत्र वितरण
संपादक वैनगंगा वार्ता
अशोक खंडारे
सिरोंचा पोलीस स्टेशन हद्दीमधील अतिशय दुर्गम व मागास तसेच नक्षलदृष्ट्या अति संवेदनशील तिघलगुडम या गावांमधील एकूण 15 घरातील 50 नागरिकांना प्रत्येकी एक याप्रमाणे कै. देवेंद्र शुक्ल फाउंडेशन, पुणे यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून प्राप्त झालेले 50 ब्लॅंकेट अत्यंत गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले.
भगवंतराव महाविद्यालय व सी व्ही रमण महाविद्यालय सिरोंचा येथे विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन त्यांना पोलीस दादाला खिडकी अंतर्गत शासनाच्या विविध विभागाकडून आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रे, दाखले काढून देण्यासाठी तसेच खास करून वाहन चालविण्याचा परवाना काढून देण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच सदर महाविद्यालयांमध्ये दिनांक 25/11/2022 पासून सदर प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
सिरोंचा तालुक्यामधील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पोलीस स्टेशन येथे एकत्र करून त्यांचा एक सराव पेपर घेण्यात आला. यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे 72 उमेदवार यांनी सहभाग घेतला. सराव पेपर घेतल्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या उमेदवारांना योग्य ते पारितोषिक तसेच खेळाचे साहित्य देऊन गौरविण्यात आले.
तसेच मौजा असरअल्ली येथील अत्यंत गरीब कुटुंबामधील मुलगी नामे लक्ष्मी मडे ही शेतीमध्ये मजुरीचे काम करून आलेल्या पैशातून पोलीस भरतीची तयारी करत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तिला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले असून मदत करण्याची तजवीज ठेवली आहे.
वरील प्रमाणे उपक्रम राबविण्यात आलेले असून सदर उपक्रम राबविल्यामुळे पोलिसांप्रती जनतेमध्ये असलेली प्रतिक्रिया अगदी बोलकी असून नक्षल विचारधारा मोडकळीस आणण्यासाठी याची नक्कीच मदत होणार आहे.
गडचिरोली विशेषता सिरोंचा येथील पूर परिस्थिती बाबत माहिती दिली असता सदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल देवेंद्र शुक्ल यांनी प्राधान्याने पोलीस स्टेशनसाठी एक मोटार बोट उपलब्ध करून देण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने दि. 05 नोव्हेंबर रोजी प्रा.भांडारकर विद्या संशोधन केंद्र या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला. सदरची मोटार बोट ही फाउंडेशनने पोलीस स्टेशन पर्यंत आणून ती बोट पोलीस स्टेशनला सुपूर्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी हिवाळ्याच्या अनुषंगाने गरजूंना वाटप करण्याकरता 50 ब्लॅंकेट्स सुद्धा मदत म्हणून दिलेले आहेत. पोलीस स्टेशन येथे घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये देवेंद्र शुक्ल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अमोल शुक्ल,माधवराव देशपांडे - महाराष्ट्र संघ प्रचारक, राजाभाऊ कदम -शासकीय संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र आणि गौरव कदम - दैनिक लोकमत पत्रकार पुणे या सन्माननीय सदस्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन मधील हद्दीमधील पोलीस पाटील तसेच सिरोचा मधील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक हेसुद्धा हजर होते.सगळ्यांच्या वतीने नमूद ट्रस्टचे आभार मानण्यात आले तसेच ट्रस्ट चे संस्थापक यांनी भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

