दिलेल्या मुदतीत शाळेची वस्तुनिष्ठ माहिती युडायस प्लस प्रपत्रात आॕनलाईन भरा : मुख्याध्यापक कार्यशाळेत केद्रप्रमुखाची सुचना
देसाईगंज येथे आमगाव व विसोरा केंद्रातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा
संपादक अशोक खंडारे
देसाईगंज दि.१
जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली प्रपत्र (U-DISE Plus) भारत सरकारमार्फत ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या (C.B.S.E., I.C.S.E., I.B., IGCSE, State Board, other इत्यादी), अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते. त्यामुळे युडास प्लस प्रपत्रामध्ये दिलेल्या मुदतीत शाळेची वस्तुनिष्ठ माहिती आॕनलाईन युडायस प्लस मध्ये भरावी अशा सुचना देसाईगंज येथिल गटसंसाधन केंद्रात दि.१ नोव्हेंबर रोजी आयोजित आमगाव व विसोरा केंद्रातील मुख्याध्यापक कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी दिल्या.
सन २०१८-१९ या वर्षापासून राज्यातील सर्व शाळांची माहिती www.udiseplus.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करून अंतिम झालेली माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामार्फत प्रमाणीत करून राज्याची माहिती भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यामधील सर्व शाळांकडून शाळा तपशील, विद्यार्थी संख्या, दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण इ. माहिती संकलित करण्यात येते व सदर माहितीचा उपयोग शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व समग्र शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता केल्या जातो. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ च्या अंमलबजावणीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्याध्यापक यांनी शाळाप्रमुख म्हणून काटेकोर व वस्तुनिष्ठ माहीती सदर प्रपत्रात आॕनलाईन भरावी,असे मार्गदर्शन केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी केले.
कार्यशाळेला गटसमन्वयक संजय कसबे ,आमगाव व विसोरा केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद गुरनुले, विषयसाधन व्यक्ती अरविंद घुटके, जितेंद्र पटले,रामकृष्ण रहांगडाले, राणू ठाकूर, होमा सहारे , विषयतज्ज्ञ अल्का सोनेकर , वैशाली खोब्रागडे ,खाजगी शाळेचे मुख्याध्यापक भोजराज ठाकरे , ज्ञानेश्वर लाडे , विष्णू दुनेदार , निलेश तित्तीरमारे , मुख्याध्यापिका चंदा कुळमेथे , जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व काही शाळांचे मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

