तिमिरातूनी तेजाकडे.. लोकबिरादरीच्या पाखरांची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी- अनिल बारसागडे

0
तिमिरातूनी तेजाकडे..
लोकबिरादरीच्या पाखरांची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी- अनिल बारसागडे
 
गडचिरोली:-
 ज्या मातीत शतकानुशतके केवळ उपेक्षा, अज्ञानाचा तिमिर आणि अभावाचे सावट पसरलेले होते, त्याच गडचिरोलीच्या दऱ्याखोऱ्यांतून आज ध्येयाचा एक लखलखता प्रकाशपुंज उजळून निघाला आहे. निबिड अरण्यगर्भात, जिथे निसर्गाचे रौद्र अन् सुंदर रूप एकत्र नांदते, तिथे मानवी जिद्दीने घडवलेला एक नव इतिहास आकारास आला आहे. 

हेमलकसा या दुर्गम, नक्षलग्रस्त आणि भौगोलिकदृष्ट्या तुटलेल्या भूमीतून वैद्यकीय शिक्षणाच्या (MBBS) उंबरठ्यावर पाऊल ठेवणारी आठ आदिवासी व वंचित पाखरे केवळ एक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेली नाहीत; तर त्यांनी नशिबाचे पारंपारिक संकल्पनांचे फेरे, दारिद्र्याची भीषण शृंखला आणि भौगोलिक मागासलेपण छिन्नविच्छिन्न करून ध्येयाच्या आकाशात एक अलौकिक गरुडझेप घेतली आहे.

 ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये भामरागडच्या रानवाटांवर 'लोकबिरादरी प्रकल्पाची' मुहूर्तमेढ रोवली होती. एका हातामध्ये सेवाभाव आणि दुसऱ्या हातात करुणेची मशाल घेऊन रोवलेले ते रोपटे आज एका भव्य वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या उभ्या आयुष्याचे रान करून या भूमीतील माणसांना आत्मसन्मानाची शिकवण दिली. आज अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांच्या नेतृत्वात 'लोकसाधना सेंटर फॉर एक्सलन्स'च्या माध्यमातून जो शैक्षणिक कार्याचा अध्याय रचला गेला, ही आठ रत्ने म्हणजे त्याच तपस्येचे फळ आहे. हि एका संपूर्ण संकल्पनेची, संघर्षाची आणि नि:स्वार्थ सेवेची दिग्विजयी पताका आहे.

प्रतिकूलतेच्या खडकावर फुललेली पारिजातके म्हणजे हे विद्यार्थी! या विद्यार्थ्यांच्या यशाचे मोल साध्या मोजपट्ट्यांनी करता येण्यासारखे नाही. भामरागड तालुक्यातील भटपारसारख्या गावाची कल्पना करा, जिथे पोहोचण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही, पावसाळ्यात नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे जगाशी संपर्क तुटतो आणि मोबाईलच्या जाळ्याचा (Network) सुगावाही जिथे लागत नाही. अशा अभावांच्या अंधारात वाढलेली ही मुले जेव्हा मुंबईच्या कूपर किंवा पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजसारख्या नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात, तेव्हा तो केवळ योगायोग उरत नाही; ती एका अखंड तपस्येची, १५-१६ तासांच्या अभ्यासाची आणि ध्येयसक्तीची पराकाष्ठा ठरते.

 या सर्व विद्यार्थ्यांच्या कुळात उच्च शिक्षणाचा गंध अनुभवणारी ही अगदी पहिलीच पिढी आहे. वैद्यकीय क्षेत्रासारख्या खडतर आणि प्रतिष्ठा लाभलेल्या प्रवासात त्यांनी ठेवलेले हे पाऊल त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला, नव्हे तर संपूर्ण गावाला सामाजिक आणि आर्थिक दास्यातून मुक्त करणारे ठरणार आहे. हे विद्यार्थी पिढ्यानं-पिढ्यांच्या अंधाराला छेदणारे दीप ठरोत.

या आठ विद्यार्थ्यांचे नामांकित विद्यापीठांमधील स्थान :
पराग नामदेव चौधरी - बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे
ओम संजय सिडाम - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
रूपेश राजू ताडो - एच.बी.टी. व डॉ. आर. एन. कूपर मेडिकल कॉलेज, मुंबई
अंजली रमेश कंडेला - श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे
राजेश समैया जाडी - श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे
कृष्णवेणी सत्यम वेलादी - अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, सोलापूर
करण लछीराम अजमेरा - सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कुडाळ
तुषार लोमेश मेश्राम - सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कुडाळ

मोठमोठ्या शहरांतील महागड्या कोचिंग क्लासेसच्या, लाखांच्या मानधनाच्या आणि चकाचौंध जगाच्या पलीकडे जाऊन, केवळ आत्मीयता आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावरही क्रांती घडवता येते, हे या यशाने सिद्ध केले आहे. 

या विद्यार्थ्यांचे खरे वेगळेपण त्यांच्या यशात तर आहेच, पण त्याहून अधिक त्यांच्या विचारांच्या प्रगल्भतेत आहे. "आम्ही डॉक्टर झाल्यावर आमच्याच भागात परतून आमच्या बांधवांची सेवा करू," हा त्यांनी घेतलेला ध्यास म्हणजे सेवेची एक नवी आणि उदात्त व्याख्या आहे. शहरांच्या झगमगाटात आणि पैशांच्या मोहात स्वतःला हरवू न देता, आपल्या मुळांशी घट्ट राहून मातीचे ऋण फेडण्याची ही वृत्ती त्यांच्यातल्या डॉक्टरला अधिक संवेदनशील आणि थोर बनवते.

हेमलकसाच्या मातीतून फुललेले हे विद्यार्थी आता केवळ स्टेथॉस्कोप हाती घेणारे वैद्य उरणार नाहीत; तर ते गडचिरोलीच्या प्रत्येक झोपडीतील, प्रत्येक रानवाटेवरील तरुण मनांसाठी आशेचा एक किरण बनतील. "परिस्थिती कितीही खडतर असली, तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येऊ शकते," हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून पेरला आहे.

भामरागडच्या जंगलातील रानपाखरांप्रमाणे जगणाऱ्या या मुलांच्या पंखांत हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाने विश्वासाचे बळ दिले आणि आज त्यांनी यशाचे खुले आकाश कवेत घेतले आहे. हे आठ डॉक्टर उद्या गडचिरोलीच्या रानावनातील, डोंगरदऱ्यातील, अंधाराला, अज्ञानाला आणि उपेक्षेला कायमचे वेशीबाहेर काढणारे नवयुगाचे प्रेषित ठरावेत हिच मनस्वी सदिच्छा.

हेमलकसाच्या मातीत रुजलेली ही प्रकाशाची झाडे आगामी काळात संपूर्ण समाजाला आपल्या सेवेच्या आणि ज्ञानाच्या सावलीने समृद्ध करतील, यात शंका नाही!

लेखक : © अनिल केशवराव बारसागडे
गडचिरोली- ४४२६०५ (महाराष्ट्र)
दिनांक : १७/०९/२०२६

📲 ९४२०५१०२३९
📩 anil.barsagade@gmail.com
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !