पोटफोळी नदी पुलाजवळ एस टी पलटली; ३० प्रवासी जखमी, जीवीत हानी टळली
स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; ६८ प्रवासी होते बसमध्ये, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली–चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळील पोटफोळी नदी पुलाच्या परिसरात शुक्रवारी दुपारी २.३० वा .सुमारास एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी २९ जखमी प्रवाशांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच ०६-८८४८ क्रमांकाची एसटी बस गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात होती. पोटफोळी नदी पुलाच्या नव्या बांधकामाच्या ठिकाणी अचानक बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरच पलटी झाली.
अपघाताच्या वेळी बसमध्ये तब्बल ६८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये एका लहान चिमुकल्याचाही समावेश होता. बस पलटी होताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली.अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, प्राथमिक माहितीनुसार सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मोठी जीवितहानी टळल्याने प्रशासन आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, एसटी बसचे स्टेअरिंग लॉक होणे हे अपघातामागील प्राथमिक कारण असल्याचे समोर आले असून, या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

