मंगळवेढ्याच्या महिलेची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे धाव
मंगळवेढा /सोलापूर :- मंगळवेढा येथील रहिवाशी असलेल्या व पंढरपूर तालुक्यात नर्सिंग चे शिक्षण घेणाऱ्या बेपत्ता तरुणीच्या आईने अखेर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे धाव घेतली असून त्यामुळे मंगळवेढा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथे नर्सिंग कॉलेज ला जात असल्याचे सांगून मंगळवेढा येथील एक 19 वर्षीय तरुणी दिनांक 30.06.2026 पासून बेपत्ता असून त्याबाबतची रितसर तक्रार सदरहू बेपत्ता तरुणीच्या आईने त्याच दिवशी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यादिवसापासून बेपत्ता तरुणीची आई आपल्या मुलीचा तपास लावा म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्याकडे हेलपाटे मारत आहे परंतु बोरिगिड्डे यांच्या काळजाला अद्याप पाझर फुटलेला नाही. याऊलट तुमच्या मुलीला 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत म्हणून पोलीस बेपत्ता तरुणीच्या आईची वारंवार हेटाळणी करत असल्याचे बेपत्ता तरुणीच्या आईने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
विशेष बाब अशी की, सदरहू तरुणीला फूस लावून पळवून नेणाऱ्या संशयीत व्यक्तींची नावे सबळ पुराव्यानिशी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना बेपत्ता तरुणीच्या आईने सांगितली आहेत परंतु त्या संशयीतांनां पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे लेखी जबाब घेण्याचे व त्यांची साधी चौकशी करण्याचे धाडस अद्याप बोरिगिड्डे यांनी केलेले नाही.
दरम्यान कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून बेपत्ता तरुणीला व तिच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

