२० वर्षांपासून पंदीलवार कुटुंबीयांची महालक्ष्मी पूजनाची परंपरा कायम
आष्टी (अशोक खंडारे) :- २० वर्षांपासून आष्टी येथील पंदिलवार कुटुंबियांनी महालक्ष्मी पुजनाची परंपरा कायम ठेवली आहे
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या माजी सदस्या रुपाली पंदीलवार व सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांच्या आष्टी येथील निवासस्थानी २० वर्षांपासून महालक्ष्मी पूजन करण्यात येत आहे. समाजातील सर्वांप्रती एकोप्याची व सामाजिक बांधिलकीची भावना जपत पंदीलवार कुटुंबीयांकडून हा धार्मिक वारसा जपला जात आहे.
पंदीलवार कुटुंबीयांकडून महालक्ष्मी पूजनाचा उत्सव दोन दिवसांचा असतो. १७ सप्टेंबर रोजी देवीची स्थापना झाली असून आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजतापासून घटस्थापना, विधीवत पूजन, सुहासिनींकडून ओटी भरणे, आरती करुंन महालक्ष्मीला प्रसन्न केले जाते. दरवर्षी या महालक्ष्मी पूजन उत्सवात अनखोडा, मार्कंडा (कं), इल्लूर, आष्टी, कुनघाडा, ठाकरी, चौडमपली,चपराळा, चंदनखेडी, रामपूर आदी गावांतील भाविक सहभागी होतात.
उत्सवानिमित्ताने शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजतापासून ते २ वाजेपर्यंत विविध धार्मिक उपक्रम व शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी पूजन उत्सवात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन जि.प.च्या माजी सदस्या रुपाली पंदीलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार, मधुकर पंदीलवार, आयुष पंदीलवार यांनी केले आहे.

