मृत म्हणून केली तेरवी व समाधीही बांधली मात्र वर्षभरानंतर माता घरी पोहचली
गडचिरोली (एटापल्ली) : मृत झाली म्हणून तेरवी केली व समाधीही बांधली गेली मात्र वर्षभरानंतर माता सुखरूप घरी पोहचली ही घटना अचानक सुखद धक्का कुटुंबीयांना देऊन गेली मानसिक अस्वस्थतेमुळे घरातून निघून गेलेली व्यक्ती वर्षभर शोधूनही सापडली नाही, तर कुटुंबीयांची आशा पूर्णतः मावळते. नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथून रेस्क्यू करण्यात आलेल्या एका ६० वर्षीय आदिवासी महिलेच्या बाबतीतही असेच घडले. कुटुंबीयांनी तिचा दुरवर शोध घेऊनही पत्ता न लागल्याने तिची तेरवी केली, स्मरणार्थ समाधी बांधली आणि गावजेवणही दिले. मात्र, तब्बल वर्षभरानंतर ती महिला जिवंत असल्याचे समोर आले आणि संपूर्ण कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील रस्त्याच्या कडेला सुमारे दोन महिन्यांपूर्वी डोमाजी आधार फाउंडेशन, नांदेडच्या टीमने या महिलेला रेस्क्यू करून नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रमात आश्रय दिला होता. रेस्क्यूचा व्हिडिओ आश्रमाकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. बघता बघता तो दुरपर्यन्त पोहचला. आणि व्हिडिओ सदर महिलेच्या भाच्याने पाहिल्यानंतर तिची ओळख पटली आणि कुटुंबीयांना ती जिवंत असल्याचे समजले. सदर महिलेचे नाव दस्सो मुक्का कांदो असून ती आदिवासी समाजातील आहे. तिचे मूळ गाव मोहूर्ती, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली हे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वसलेले छोटेसे जवळपास 20 ते 25 कुटुंब असलेले हे नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त गाव आहे. या गावापासून छत्तीसगड राज्याची सीमा सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. हे गाव महाराष्ट्रात असले तरी बाजारपेठेसह दैनंदिन सर्व व्यवहार मोठ्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये होतात. महिलेची मातृभाषा छत्तीसगढी गोंडी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मानसिक स्थिती ठीक नसल्याने 'दस्सो' ही अचानक घरातून निघून गेली होती. कुटुंबीयांनी वर्षभर तिचा शोध घेतला; मात्र कुठलाही पत्ता न लागल्याने काही महिन्यांपूर्वी तिची तेरवी सुद्धा करण्यात आली. आणि तिच्या स्मरणार्थ समाधी बांधण्यात आली. तसेच गावातील नागरिक व नातेवाईकांसाठी जेवणाची मेजवानीही देण्यात आली. दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या इंस्टाग्राम वरील व्हिडिओमुळे कुटुंबीयांना पुन्हा आशेचा नवा किरण मिळाला. फाउंडेशनच्या प्रयत्नांतून महिलेची ओळख पटली. शेवटी रविवार, दि.6 सप्टेंबर रोजी डोमाजी आधार फाउंडेशनच्या चमूने या महिलेला तिच्या मोहूर्ती या मूळ गावी सुखरूप पोहोचविले. घरी पोहोचताच कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ज्या आईच्या परतीची आशा कुटुंबीयांनी सोडून दिली होती, ती आई पुन्हा जिवंतपणे घरी परतली. मुलगा-मुलीला आई, तर पतीला पुन्हा पत्नी मिळाली. या भावनिक पुनर्भेटीने उपस्थितांचेही डोळे
पाणावले. दस्सोच्या स्वागतास्तव सारा गाव एकत्र आला जमा झाला होता. कुटुंबीयांनी सदर सेवाभावी संस्थेचे आभार व्यक्त केले

