स्वतः जखमी झाला; पण लेकीला वाघाच्या तावडीतून वाचविले - बापाच्या धाडसाने मृत्यूच्या दाढेतून दोघांचे वाचले प्राण
शेतात खत टाकताना दबा धरून बसलेल्या वाघाने केला अचानक हल्ला; भाऊराव म्हशाखेत्री गंभीर जखमी
गडचिरोली (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याची थरारक घटना समोर आली आहे. स्वतःच्या शेतात मोठ्या मुलीसोबत खत टाकत असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. मात्र, लेकीच्या डोळ्यांसमोर संकट उभे ठाकताच बापाने जीवाची पर्वा न करता वाघाशी दोन हात केले आणि स्वतःसह लेकीचे प्राण वाचविले.
ही धक्कादायक घटना रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडली. भाऊराव भगवान म्हशाखेत्री हे आपल्या मोठ्या मुलीसोबत शेतातील पिकाला खत टाकण्यासाठी गेले होते. याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक भाऊराव यांच्यावर हल्ला केला.
वाघाने केलेल्या हल्ल्यात भाऊराव गंभीर जखमी झाले. मात्र, संकटाच्या त्या क्षणी त्यांनी हार न मानता वाघाचा प्रतिकार केला. वाघाशी झालेल्या या जीवघेण्या झुंजीत त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलीला वाचविले. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भाऊराव म्हशाखेत्री यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी रुग्णालयात जाऊन भाऊराव म्हशाखेत्री यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती जाणून घेतली.
शेतशिवारात दहशत; वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने या भागातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

