गडचिरोली जिल्ह्या विकासाच्या वाटेवर पण गंभीर रुग्णांना न्यावे लागते खाटेवर
नैनगुडा येथे संतापजनक प्रकार! रस्त्याअभावी गर्भवतीला ३ किमी खाटेवरून नेले, पुन्हा 'खाट'च बनली रुग्णवाहिका
रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचेना; किती दिवस भोगायचा हा वनवास?
गडचिरोली (अशोक खंडारे) :- शासनाचे मते गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या वाटेवर पण रुग्णांना खाटेवर न्यावे लागत असल्याने शासनाचे पितळ उघडे पडले आहे.
दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोटमी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या नैनगुडा येथे रस्ता नसल्याने शनिवारी गर्भवती महिलेला तब्बल तीन किलोमीटर खाटेवरून रुग्णवाहिकेपर्यंत न्यावे लागले.
विशेष म्हणजे, संबंधित रुग्ण महिला स्वतः आशा कार्यकर्ती असल्याची माहिती आहे. आरोग्य यंत्रणेच्या तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच रस्त्याअभावी रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी खाटेचा आधार घ्यावा लागल्याने दुर्गम भागातील सुविधांची स्थिती स्पष्ट झाली आहे. प्रीती अमोल पल्लो वय २७, रा. नैनगुडा असे संबंधित गर्भवती महिलेचे नाव आहे.
नैनगुडा हे कोटमी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येते. कोटमी ते आसावंडीपर्यंत रस्ता उपलब्ध आहे. मात्र, आसावंडीपासून नैनगुडापर्यंत सुमारे तीन किलोमीटर रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही.
प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर प्रीती यांना ग्रामस्थांनी खाटेवरून तीन किलोमीटर अंतर पार करून रुग्णवाहिकेपर्यंत नेले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोटमी-पैडी मार्गे गडचिरोलीकडे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्रसूती झाल्याची माहिती आहे. वेळेत मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
किती दिवस भोगायचा हा वनवास?
रस्ता नसल्याने आजही दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी खाटेचा आधार घ्यावा लागत आहे. नैनगुडा येथील घटना ही केवळ एका दिवसाची समस्या नसून अशा घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. प्रसूतीच्या वेदनांमध्येही मातेला रस्ता मिळत नसेल, तर दुर्गम भागातील नागरिकांनी आणखी किती दिवस हा वनवास भोगायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता या भागात कायमस्वरूपी रस्ता आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

