पाच वर्षांपासून आष्टी पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरविना; उपचाराअभावी मुक्या जीवांचा मृत्यू
शेतकरी, पशुपालक व वन्यजीव प्रेमींचा संताप; कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी
आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या तब्बल पाच वर्षांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याविना सुरू असल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि वन्यजीव प्रेमींमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांच्या अभावामुळे आजारी, जखमी व अपघातग्रस्त जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
परिसरात अपघातग्रस्त जनावरे, आजारी पाळीव प्राणी तसेच जखमी वन्यजीव आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक असते. मात्र आष्टी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने अनेकदा उपचारासाठी मोठी अडचण निर्माण होते. काही वेळा वन्यजीव प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांतून जखमी प्राण्यांना जीवदान मिळते, मात्र प्रत्येक वेळी अशी मदत उपलब्ध होत नसल्याने अनेक मुक्या जीवांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालक चिंतेत असून त्यांच्या जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत.
स्थानिक नागरिक, पशुपालक आणि वन्यजीव प्रेमींनी प्रशासनाकडे आष्टी पशुवैद्यकीय दवाखान्यात तातडीने कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून नियमित आरोग्यसेवा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.
मुक्या प्राण्यांच्या जीवाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

