'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत २२ जुलैला गडचिरोलीत महसूल सेवा शिबिर; शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली
गडचिरोली (अशोक खंडारे):-
राज्य शासनाच्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्या वतीने मंगळवार, २२ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे विशेष महसूल सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण' या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सुमनंद मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.
या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांची माहिती, लाभार्थी नोंदणी, प्रमाणपत्रांचे वितरण, सातबारा उतारा, फेरफार, जमिनीशी संबंधित महसुली प्रकरणे, अतिक्रमणासंदर्भातील बाबी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण यांसारख्या अनेक सेवा दिल्या जाणार आहेत.
याशिवाय शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठीही या शिबिराचा उपयोग होणार असून, नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा उतारा तसेच संबंधित कागदपत्रांच्या मूळ व छायाप्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे. तसेच सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी शिबिरस्थळी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

