अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी 3 ट्रॅक्टर जप्त तर जेसीपी चा शोध सुरू
अहेरी :- उपवनसंरक्षक आलापल्ली ते आष्टी रोड जवळील नागेपल्लीच्या नाल्याजवळून जात असताना अहेरी वनपरिक्षेत्रात कंपार्टमेंट नंबर २८ मधिल अवैध गौण खनिज उत्खनन चालू असल्याचे दिसल्याने त्यांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. त्यानुसार ट्रॅक्टरच्या क्रमांकावरून टेकूलगुडा, महागाव व आलापल्ली येथील तीन ट्रॅक्टरचा शोध लावून आज अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करण्यात आले. आलापल्ली येथील जेसीपी दुसऱ्या कामावर गेल्याची माहिती असल्याने ती जमा करण्याच्या शोधात वन कर्मचारी असल्याची माहिती तपास अधिकारी राऊंड ऑफिसर संतोष पडालवार यांनी दिली.
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 अंतर्गत तहसीलदारांनी आलापल्ली निवासी सय्यद जाकीर हुसेन गुलाम सय्यद यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 क च्या कटिंग मधून निर्माण झालेल्या गौण खनिज वाहतूक करून नागेपल्ली येथील 15 /32 क्षेत्र 9.26.70 हेक्टर ,आर मध्ये जमा करून ठेवण्याबाबत सध्या वीस ब्रासची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सदर काम करावयाचे आहे असे सांगून रावजी इस्टाम टेकुलगुडा, तुकाराम नेताम महागाव व स्वप्नील मडावी आलापल्ली यांच्या ट्रॅक्टरने वाहतूक करण्यास सांगितले. मात्र परवाना एका ठिकाणाचा व गौण खनिज उत्खनन वनपरिक्षेत्रात करीत होते अशी माहिती तपास अधिकारी संतोष पडलवार यांनी दिली.
दरम्यान उपवनसंरक्षक दिपाली तलमले दि. १८ जुलै ला दुपारच्या काळात दौरा करीत असताना सदर बाब दिसल्याने ट्रॅक्टर मधील आरोपी ट्रॅक्टरसह पसार झाले. मात्र त्याचे चित्रीकरण झाले होते.त्यामुळे त्या आधारे वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रात्र पासून ट्रॅक्टरचा शोध मोहीम घेऊन सध्या तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत अधिक तपास वनाधिकारी करीत आहेत

