पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात चामोर्शी येथे NSUI व युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

0
 पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात चामोर्शी येथे NSUI व युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन




 

चामोर्शी :   खरीप हंगामाची सुरुवात होत असतानाच पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकरी वर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. शेती मशागतीपासून पेरणी, सिंचन, वाहतूक आणि कृषी अवजारांच्या वापरापर्यंत सर्वच खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेली पेट्रोल-डिझेल दरवाढ ही शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका यावेळी करण्यात आली. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत असताना केंद्र शासनाने इंधन दरवाढ करून जनतेवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना शेती मशागत, पेरणी, सिंचन आणि माल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात थेट वाढ असून त्यांचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे. एकीकडे शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईच्या ओझ्याखाली भरडला जात आहे.
या पार्श्वभूमीवर चामोर्शी येथील एच.पी. पेट्रोल पंपावर NSUI व युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध करत पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर तात्काळ कमी करावेत, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
आंदोलनाचे नेतृत्व NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केले. यावेळी पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेस चामोर्शी अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चिंचघरे, कॉंग्रेस मिडिया तालुका अध्यक्ष विजय लाड, कालीदास बुरांडे,पीपलदास सोयाम, सुभाष कोठारे, हेमंत कोवासे, तेजस कोंडेकर, आशिष घेर, संजय बुरांडे, ओमप्रकाश चौधरी, अभिषेक वाळके, अमन लाकडे, प्रफुल बारसागडे यांच्यासह NSUI, युवक काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राहुल वैरागडे यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांचा हंगाम सुरू असताना इंधन दरवाढ करणे म्हणजे शेतकरी व सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे. केंद्र शासनाने तात्काळ पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा NSUI व युवक काँग्रेसच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व केंद्र शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !