अवैध वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित; तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे

0
अवैध वाळू  उपसा प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित; तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे


ट्रॅक्टर अपघातात एकाचा मृत्यू; चौकशीनंतर महसूल विभागावर कठोर कारवाई


गडचिरोली | प्रतिनिधी | दि. २७ जून
देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाट, वैणगंगा नदी परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेची जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी कठोर दखल घेत महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मौजा कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाट परिसरात विलास महादेव ढकले (वय अंदाजे ३६, रा. जिल्हेवाडा, ता. देसाईगंज) हे ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
भरारी पथकाच्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालात १० जून २०२६ नंतर संबंधित रेतीघाटावरील उत्खनन बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही तेथे अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
या निष्कर्षांच्या आधारे संबंधित मंडळ अधिकारी अर्चना टिस्कुले व तलाठी महादास ठाकरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुढलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला कोणतीही पाठीशी घातली जाणार नाही. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
@@@@@@
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !