अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या अंजान बालकाला वाघाने नेले फरफटत

0
अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या अंजान बालकाला वाघाने नेले फरफटत



अर्जुनी (मोरगाव) :
तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे शुक्रवारला रात्री ८ वाजताचे
 सुमारास अंगणातील खेळत असलेल्या सहा वर्षाच्या अंजान बालकाला वाघाने फरफटत नेले या भिषण हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ६) असे मृत बालकाचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल हा घराजवळ अंगणात खेळत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली. क्षणार्धात वाघाने प्रज्वलला उचलून जंगलाच्या दिशेने ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना पाहताच कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरडाओरड करत परिसर दणाणून सोडला.
त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. काही वेळाच्या शोधानंतर घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, वाघाच्या हल्ल्यात झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे धाबेटेकडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरात वारंवार वाढत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. संबंधित वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !