चितळाची शिकार प्रकरणी चौघांना अटक, मांस व कातडे जप्त
चामोर्शी (प्रमोद दरेकर) :-
वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करणाऱ्यांवर वनविभागाने मोठी कारवाई करत रेखेगाव जंगल परिसरातून चितळाची शिकार केल्याप्रकरणी चौघांना अटक केली. सदर कारवाई नुकतीच भाडभिडी उपवन क्षेत्रात करण्यात आली.
चामोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत भाडभिडी उपवन क्षेत्रातील रेखेगाव जंगल परिसरात शिकार होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेले राजीव कांदो, वैभव तिमा, नरथ कोवासे व संतोष हेडा (सर्व रा. रेखेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. धाडीत आरोपींकडून तब्बल ११.४०० किलो वजनाचे चितळाचे मांस तसेच कातडे जप्त करण्यात आले. यावरून वन्यजीवांची शिकार करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
वन्यजीवांची अवैध शिकार रोखण्यासाठी वनविभाग सतर्क असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे

