शासकीय आश्रम शाळा लोहारा येथील दोन शिक्षक निलंबित
विद्यार्थिनींची बॅडटच आणि मारहाणीबाबत तक्रार
अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा लोहारा ता . मुलचेरा येथील विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून दोन शिक्षकांवर मूलचेरा पोलीस स्थानकात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार शासकीय आश्रम शाळा लोहारा येथील पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फड आणि माध्यमिक सुभाष खुशबराव लांडे यांच्याविरुद्ध येथिल 24 विद्यार्थिनींनी शाळेतील अधिक्षिकाकडे शनिवारी बॅड टच आणि मारहाण बाबत तक्रार दिली होती.संबंधित अधिक्षिकाने येथिल मुख्याध्यापक पुरी यांच्याकडे तक्रार देताच या गंभीर बाबीची दखल घेऊन येथील मुख्याध्यापकाने रविवारी सकाळीच अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना या घटनेची माहिती दिली. लगेच प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) सुहास वसावे आणि सहाय्यक प्रकल्प (शिक्षण) एस पी डोंगरे यांना रविवारी संबंधित शाळेत चौकशीसाठी पाठविले. चौकशीअंती गुन्हा झाल्याचा निष्पन्न झाला.
त्यानंतर लोहारा शासकीय आश्रम शाळेतील तब्बल 24 विद्यार्थिनींना सोमवारी वैद्यकीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे पाठविण्यात आले. मात्र या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस तक्रार झाल्याशिवाय वैध्यकीय चाचणी होणार नसल्याने कळताच तात्काळ मुलचेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.मुलचेरा पोलीसांनी सदर विद्यार्थिनींची चौकशी करून फिर्यादीच्या सांगण्यावरून पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फळ यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि मारहानीचा तर माध्यमिक शिक्षक सुभाष खुशबराव लांडे यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई मुलचेरा पोलीस करीत आहेत.
विशेष म्हणजे संदीप फड हे कन्या शाळा, सोडे आणि सुभाष लांडे हे इंग्रजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथून याच शैक्षणिक क्षेत्रात लोहारा येथील शासकीय आश्रम शाळेत रुजू झाले होते.
नुकतेच भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने येथील विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली होती या घटनेचे गांभीर्य पाहून येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा लोहारा च्या शिक्षकांवर येथील विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी तात्काळ शाळेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंति गुन्हा निष्पन्न होताच संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

