महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी यांचा १९ डिसेंबर पासून होणारा संप स्थगित
एकीचे बळ, एकता तिथे सुरक्षितता
गडचिरोली:-
दिनांक: १८/१२/२०२५
महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघ यांनी शासनास दिनांक १६/१२/२०२५ रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची नोटीस दिलेली होती. त्याअनुषंगाने दिनांक १८/१२/२०२५ रोजी मा. मंत्री महसूल यांचे समवेत महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाच्या प्रतिनिधींसमवेत महसूल विभागाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा विषयक विविध मागण्यांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये मा. मंत्री महसूल यांनी पुढील प्रमाणे आश्वासन दिलेले आहे.
१. मावळ जिल्हा पुणे येथील प्रकरणामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे निलंबन तीन दिवसांच्या आत मागे घेणार, त्यासाठी विभागीय आयुक्त यांचे कडून तात्काळ अहवाल मागवणार. दरम्यानचे कालावधीमध्ये जिल्हाधिकारी स्तरीय झालेल्या गौण खनिज विषयक सर्व कारवाया मागे घेण्याबाबत मा. मंत्री महोदय यांनी निर्देश दिले.
२. पालघर मधील कर्मचारी यांचे निलंबन तात्काळ मागे घेणार.
३. गौण खनिज प्रकरणी अनाधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवीन प्रणाली विकसीत करून रात्री अपरात्री अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. सदर प्रणालीनुसार थेट नोटीस तयार होईल, त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांचा त्रास कमी होईल.
४. नायब तहसिलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, यांचे वेतन श्रेणी वाढीबाबत प्रस्ताव वेतन त्रुटी समितीने फेटाळल्यामुळे विभागामार्फत विशेष प्रस्ताव तयार करून येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजूर करून घेणार.
५. महसूल सेवकांचे आंदोलन काळातील वेतन तात्काळ अदा करण्याबाबत विभागास आदेशीत करण्यात आले.
६. महसूल विभागाचे सर्व संवर्ग कार्यालयाचे सुधारीत आकृतीबंध तात्काळ मंजूर करण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधी सोबत विभागाची बैठक दिनांक १९/१२/२०२५ रोजी ठेवण्याबाबत सविस्तर निर्देश दिले.
७. पोलीस विभागाच्या धर्तीवर नायब तहसिलदार पदासाठी महसूल विभागांतर्गत परीक्षा घेण्याबाबत मागणी मान्य करण्यात आली.
८. अर्धन्यायिक प्रकरणांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्याबाबत व पोलीस विभागाच्या हस्तक्षेपाबाबत मा. मंत्री महसूल हे मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी तात्काळ चर्चा करणार आहेत.
९. मा. मंत्री महोदय यांनी सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही दबावाखाली चुकीचे काम करू नये तसेच चुकीच्या कामासाठी कोणी आग्रह धरून त्रास देत असल्यास सदर बाब मा. मंत्री महोदय यांचे निदर्शनास आणून देण्यात यावी, याबाबत विशेषत्वाने आश्वस्त केले आहे.
१०. भारतीय दंड संहिता २०२३ अन्वये महसूल अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषित करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यासाठी गृह विभागास पाठपुरावा करणार.
उपरोक्त प्रमाणे मा. मंत्री महसूल यांनी तात्काळ घेतलेल्या निर्णयामुळे व प्रलंबित मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने संपूर्ण मागण्या मान्य होई पर्यंत महसूल महासंघाद्वारे दिनांक १९-१२-२०२५ रोजी पासून पुकारलेले कामबंद आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत आहे.
महसूल अधिकारी कर्मचारी महासंघाच्या प्रमुख मागण्यांबाबत अतिशय सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तात्काळ कार्यवाही बाबत दिलेल्या आश्वासनाबद्दल मा. मंत्री महसूल, मा. अपर मुख्य सचिव महसूल व मंत्रालयातील महसूल विभागातील सर्व अधिकारी यांचे समन्वय महासंघ आभार व्यक्त करीत आहे.

