सुवर्ण पदकासह दोन पदकांची गवसणी घालणाऱ्या आष्टीच्या कु. श्वेता कोवे हिचा जिल्हा प्रशासनाने केला गौरव
गडचिरोली, (जिमाका) दि. 18 डिसेंबर : दुबई येथे दि. 8 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत झालेल्या एशियन युथ पॅरा गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या कु. श्वेता मंजु भास्कर कोवे हिने धनुर्विद्या (कंपाऊंड राऊंड) प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक व सांघिक कांस्यपदक पटकावून जिल्ह्याचे, राज्याचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या घवघवीत कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या वतीने कु. श्वेता कोवे हिचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले, “कु. श्वेता कोवे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी अत्यंत गौरवास्पद असून तिचे यश हे गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी नमूद केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कु. श्वेता कोवे ही खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी (ता. चामोर्शी) येथील महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत असून ती वर्ग आठवीपासून धनुर्विद्या या खेळाचा नियमित सराव करीत आहे. सध्या तिचा सराव खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी येथे सुरू असून प्रा. डॉ. श्याम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिला तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.
---

