१३ वर्षाच्या संसाराचा अखेर झाला करुन अंंत, पत्नीच्या विरहात पतीने संपविले जीवन
धानोराः-
१३ वर्षे सुखद संसार केल्यानंतर शुल्लक कारणावरून पत्नी माहेरी निघून गेली म्हणून तिच्या विरहात पतीने आपलेच जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पती पत्नीला आणावयास गेला असता, पत्नीने पुन्हा येण्यास नकार दिल्याने मानसिक तणावातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानोरा येथून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या येरकड पोलीस मदत केंद्र हद्दीतील येरकड येथे आज, ३० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सुधाकर नाजुकराव मडावी (३६) रा. येरकड असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनीषा केशव उसेंडी रा. येरकड व सुधाकरमडावी रा. येरकड यांचा प्रेमविवाह १३ वर्षांपूर्वी झालेला होता. त्यांच्या विवाह जीवनात दोन अपत्य आहेत. दोघांचाही सुखाने संसार सुरु असतानाच अचानक पती-पत्नीत वादविवाद झाल्याने पत्नी मनीषा ही एप्रिल २०२४ मध्ये आपल्या आईवडिलांकडे निघून गेली. त्यावेळपासून ती सासरी आलीच नाही. मुलांचा तरी विचार करून पत्नीने घरी यावे, असे सुधाकरला वाटत होते. मात्र ती आली नाही. मानसिक तणावातच तो अखेरीस घरी शेतीवाडी असून सुद्धा चेन्नई येथील खाजगी कंपनीत कामानिमित्त निघून गेला. नुकताच तो आपल्या घरी आला. यानंतर तो पत्नीला आणण्यासाठी तिच्या आईवडिलांच्या घरी गेला. मात्र सासु-सासऱ्यांनी मुलीला पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे सुधाकरने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेवून आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे वडिल नाजुकराव मडावी यांनी केला आहे. घटनेची माहिती येरकड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांची पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियाकडे सुपूर्द केला अधिक तपास पोलीस विभाग करीत आहे.
आजी-आजोबाच उरले नातवंडांचा आधार
विशेष म्हणजे, नाजुकराव मडावी यांना दोन मुले होती. मोठ्या मुलाने दहा वर्षांपूर्वीच गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याची पत्नी व दोन मुलांचा सांभाळ आजी-आजोबा करीत होते. त्यातच आता लहान मुलानेही जीवन संपविल्याने त्याच्याही दोन्ही मुलांचा सांभाळ आता त्यांनाच करावा लागणार असून नातवंडांना केवळ आता आजी-आजोबांचाच आधार राहिला आहे.

