नागपूर: नागपूरच्या कन्हान नदीत एका २३ वर्षीय विवाहितेने उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पतीसोबतचे काही क्षण आधी काढलेले सेल्फी घेतल्यानंतर काही सेकंदांतच महिलेने उडी घेतली. पतीच्या डोळ्यांदेखत ही घटना घडली असून, मदतीसाठी आरडाओरड करूनही वेळेत मदत मिळाली नाही आणि महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, रविवारी महिलेचा मृतदेह सापडला.
नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव ज्ञानेश्वरी विजय साकोरे वय २३ वर्षे असे असून, त्या मूळच्या रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावच्या रहिवासी होत्या. सध्या त्या पती विजय साकोरे यांच्यासोबत नागपूरच्या मानेवाडा परिसरात राहत होत्या.
शनिवारी दुपारी साकोरे दाम्पत्य काचूरवाही गावाकडे कारने जात होते. वाटेत कन्हान नदीवरील नेरी पुलावर त्यांनी पूजेचे निर्माल्य नदीत टाकण्यासाठी गाडी थांबवली. दोघांनी गाडीतून उतरून निर्माल्य नदीत टाकले आणि काही वेळ पुलावरच घालवला. याच वेळी विजय साकोरे यांनी पत्नीसोबत एक सेल्फी घेतला सेल्फी घेतल्यानंतर काही क्षणांतच ज्ञानेश्वरी यांनी नदीत उडी घेतली. विजय साकोरे यांना काही समजण्याच्या आतच त्यांची पत्नी पाण्यात पडली. त्यांनी तात्काळ मदतीसाठी आरडाओरड केली, पण जवळपास कोणीही नसल्याने मदत मिळू शकली नाही.
या घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस ठाण्याला उशिराने मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
रविवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
ज्ञानेश्वरी साकोरे यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, कुटुंबीय आणि पतीकडून माहिती घेतली जात आहे. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा इतर कोणतेही कारण होते का,किंवा काही विपरीत घडले आहे काय याचा तपास सुरू आहे.
या घटनेचा सेल्फी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, काही क्षणात आयुष्याचा अंत कसा होतो, याचे हे विदारक उदाहरण ठरत आहे. अनेकांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे