12 जहाल नक्षलवाद्यांनी केले मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण - प्रथमच एके 47 शस्त्रासह गणवेशधारी दोन नक्षल्यांचे आत्समर्पण
गडचिरोली:-
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी, (दि.6) जिल्हा दौ-यावर असतांना मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत 1 कोटी 12 लाख रुपयाचे बक्षिस असलेल्या नक्षल चळवळीतील वरिष्ठ जहाल 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये डिकेएसझेडसीएम गीरेड्डी पवनानंद रेड्डी यांची पत्नी डिव्हीसीएम सपनाक्का हिचेसह चार डीव्हीसीएम दर्जाचे वरीष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रथमच दोन जहाल नक्षलवाद्यांनी स्वयंचलीत एके-47 शस्त्र व इतर शस्त्रांसह माओवादी गणवेशात मुख्यमंत्री यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले आहे. यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
यामध्ये इंद्रावती एरिया डिव्हीसीएम सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी (55) रा. वेलगूर ता. अहेरी, कुतूल एरिया कमिटी एरिया कमिटी (कृषी विभाग) डिव्हीसीएम रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी, (55) रा. कवडीकसा, ता. धानोरा, तसेच याच दलमचे डिव्हीसीएम (कृषी विभाग) शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा, (60) व पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी (55) दोघेही रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, रा. गुर्रेकसा तह. धानोरा, कुतूल दलम कमांडर कोसा कुम्मा गोटा (35) रा. कस्तुरमेट्टा, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर छत्तीसगड, अहेरी दलम उपमकमांडर दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी (35) रा. होडरी, ता. भामरागड, राही दलम उपकमांडर अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी (27) रा. भुसापूर, पो. उसुर, ता. मारुबाक, जि. बीजापूर (छत्तीसगड), सप्लाय टिमची एसीएम संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम (40), रा. रामय्यापेठा, ता. अहेरी, भामरागड दलम एसीएम सविता ऊर्फ सनिता भिमा नरोटे (35) रा. पिपली बर्गी. ता. एटापल्ली.पश्चिम सब झोनल टेलर टिमची एसीएम अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे (25) रा. झुरी, ता. एटापल्ली, डॉक्टर टिमची एसीएम अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी (30) रा. जिंजगाव, ता. भामरागड,, कंपनी क्र. 10 चा सदस्य दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा (28) रा. मुरंगल, ता. भामरागड असे आत्मसमर्पित जहाल नक्षलवाद्यांची नावे आहेत.
आत्मसमर्पित नक्षल्यांवर असे होते बक्षिस
महाराष्ट्र शासनाने सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी, रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी, शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा तसेच पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी यांचेवर प्रत्येकी 16 लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तर कोसा कुम्मा गोटा याचेवर 8 लाख रुपये, दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी, अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी, संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम, सविता ऊर्प सुनिता भिमा नरोटे, अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे, अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी यांचेवर प्रत्येकी 6 लाख रुपये तर दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा याचेवर 4 लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 55 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यापैकी सन 2025 मध्ये आज आत्मसमर्पित झालेल्या 12 नक्षलवाद्यांसहित एकुण 34 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

