प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील पोकेटोला (मानेकसा) गावात शनिवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पोलीस भरतीच्या तयारीसाठी नियमित धावणाऱ्या दोन तरुणांचा आंघोळीसाठी वाघ नदीत उतरल्यावर पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांची नावे कृष्णकुमार हेतराम पारधी (१९) व शुभम भीमराव कांबळे (२०) अशी असून, दोघेही पोकेटोला (मानेकसा) येथील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे २५ मे रोजी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास हे दोघे युवक पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी धावण्यासाठी गेले होते. काही वेळ धावल्यानंतर घामाघूम झाल्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या वाघ नदीच्या घाटावर जाऊन अंघोळ करण्याचा निर्णय घेतला.
अंघोळ करताना नदीत खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही डोहात बुडाले. काही वेळातच ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शोध मोहीम राबवली. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले व त्यांना आमगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.
या घटनेची नोंद आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू (AD) म्हणून केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, मेहनती व शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाणारे हे दोन युवक अकाली जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.