अहेरीच्या महिला रुग्णालयाला १०० खाटांची मंजुरी व दिमतीला १७ रुग्नवाहीका
गडचिरोली : -
जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या अहेरी विधान सभा क्षेत्रात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असल्याची नेहमीच ओरड असते. यावर तोडगा काढण्यासाठी अहेरी विधान सभा क्षेत्राचे आमदार व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले होते. अखेरीस अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात १०० खाटांसाठी मंजुरी मिळाली असून यासाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे अहेरी परिसरातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा. मुलचेरा व अहेरी येथील नागरिकांना आरोग्याची सुविधा होणार आहे.
अहेरी परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. वेळेवर, रुग्णांना ने-आन करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाहीकांना मोठी कसरत करून रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी १७ रुग्णवाहिका (108) उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून अहेरी परिसरासाठी 108 क्रमांकाच्या १७ रुग्णवाहिका सुद्धा मंजूर करवून घेण्यात ना. आत्राम यांना यश आले आहे.
अहेरी विधान सभा क्षेत्र अति संवेदनशील भाग म्हणून ओळखाल्या जाते. अनेक गावांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहाचल्या नाहीत. शासनाने दुर्गम भागातील काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य युनिट सुरु केले होते. त्यातून समाधानकारक आरोग्य सुविधा स्थानिक नागरिकांना मिळत नसल्याची ओरड होती. स्थानिक नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी ना. आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व जवेली (बु) येथे सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य युनिटला प्राथमिक आरोग्य केद्राचा दर्जा मिळवून दिला आहे. तर भामरागड तालुक्यातील ताडगाव प्राथमिक आरोग्य युनिटचीही दर्जोन्नती करून आरोग्य केंद्रात परिवर्तीत केले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्य विषयक मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

