वाढोणा येथे रानटी हत्तीचा विजेचा करंट लागून मृत्यू
कुरखेडा :-
एका रानटी हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना दि.३१ डिसेंबर रविवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा येथे उघडकीस आली.
गावालगतच्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता.
वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा परिसरात रानटी हत्तींचा कळप दाखल झाला. जंगलालगत असलेल्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. दरम्यान, कळपातील एका मादी हत्तीला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.कळपावर नजर ठेवणाऱ्या वनविभागाच्या ‘ड्रोन’ कॅमेऱ्यात दिसून आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आल अशी माहिती देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे. ३० डिसेंबररोजी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे एक वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर हा कळप कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. उत्तर गडचिरोली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या धानपिकाचे व घरांचे मोठे नुकसान केले होते रानटी हत्ती आणि वाघांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे

