आता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार अहेरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेसला देणार बळ

0
 आता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार अहेरी  विधानसभा क्षेत्रात कांग्रेसला देणार बळ

    
   गडचिरोली :-
 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कांग्रेस प्रवेशाची घोषणा केल्याने दक्षिण गडचिरोलीच्या राजकारणात राजकीय दृष्ट्या कमकुवत काँग्रेसला आता नवा शिलेदार मिळाला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्राचा विचार करता अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजकारण राजकीय पक्षांपेक्षा व्यक्तिगत  वलयाभोवती केंद्रित झालेले आहे. विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने आदिवासी नेतृत्वाचा राजकीय प्रभाव असलेल्या या मतदासंघात माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थी संघटने च्या माध्यमातून राजकीय पाठबळ मिळवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन करून अजय कंकडालवार हे बिगर आदिवासीं नेतृत्व समोर आले. स्थानिक संघटनेच्या झेंड्याखाली निवडणुका लढून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सत्तेमध्ये भागीदारी मिळविण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले.  भाजप, कांग्रेस असो की इतर राजकीय पक्ष संघटना यांच्याशी समझोता करून जिल्हा परिषदेच्या सत्तेत राहण्याच्या राजकीय कौशल्याने आपला स्वतंत्र राजकीय प्रभाव निर्माण केला. दीपक आत्राम आणि अजय कंकडालवार या जोडगोळीने अहेरी विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत,पंचायत समिती, नगर पंचायतीवर झेंडा फडकाविन्यात यशस्वी झाले. मात्र दीपक दादा आत्राम यांनी बी. आर. एस. मध्ये प्रवेश करत आपली वेगळी वाट निवडली. आदिवासीं विद्यार्थी संघात उभी फूट पडली दोघांमध्ये असणारे मतभेद समोर आले.  अखेर अजय कंकडालवार  यांनी कांग्रेसचा हात धरणार असल्याचे जाहीर केल्याने दक्षिण गडचिरोलीत राजकीय ताकद  कमी असलेल्या  काँग्रेसला आता  एक प्रकारचे बळ मिळाले आहे. याचा राजकीय फायदा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच मिळू शकतो. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दीपक आत्राम यांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती. आता काँगेस चेहऱ्याच्या शोधात असल्याने अजय कंकडालवार यांच्या साथीने उमेदवार विधानसभा निवडणूकीच्या रींगणात उमेदवार उतरविणार हे स्पष्ट आहे. यामुळे या क्षेत्रात विधानसभानिवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला.दहा डिसेंबरला आलापल्लीत ते काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह काँग्रेस प्रवेश करणार आहेत. येणाऱ्या काळात  गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या. गटबाजीच्या राजकारणात ते स्वतःला कसे जुळवून घेतात, जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात आपला स्वतंत्र राजकीय प्रभाव कसे टिकवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !