दारू तस्करीसाठी अनोखी शक्कल तरीही मुलचेरा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत
मुलचेरा :-
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून दारू तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. असाच प्रकार 25 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुलचेरा तालुका मुख्यालयात उघडकीस आणत मुलचेरा पोलिसांनी वाहनासह 7 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशील शंकर ढोले, तेजस हंसराज गिरी दोघेही बाबूपेट जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार, देशी, विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून शनिवारी सकाळी 6 वाजता मुलचेरा पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, एमएच-34 बीझेड 3157 या संशयीत चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, वाहनात काहीच आढळले नाही. मात्र वाहनातील इसम संशयास्पद हालचाल करत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी वाहनाची निरखून पाहणी केली असता, वाहनाचा मागील
काही भाग वेल्डिंग करून कप्पे तयार केल्याचे आढळून आले. त्यात दारूचे बॉक्स असल्याचे दिसून आले, लगेच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन बेल्डिंग केलेल्या कप्यातून एक-एक करत रॉकेट देशी दारूचे 31 बॉक्स, इंपेरियल ब्लुचे 4 बॉक्स, बिअरचे 5 बॉक्स अशीं तब्बल 3 लाख 26 हजार रुपयांची दारू आणि 4
लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण 7 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, सोबतच चंद्रपूर येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई ठाणेदार अशोक भापकर आणि त्यांच्या चमुने केली.
पोलिसांची धडक मोहीम
विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरवठा केला जात आहे. त्यासाठी विविध शक्कल लढवत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. दारू तस्करी विरोधात पोलिसांनी मोहीम सतत सुरू ठेवली असली तरी वेगवेगळ्या युक्त्या वापरून जिल्ह्यात दारू पुरवठा करत आहेत.

