शेताकडून सायकलने घराकडे येत असलेल्या शेतकऱ्यास रानटी हत्तीने रस्त्यावर चिरडले

0
 शेताकडून सायकलने घराकडे येत असलेल्या शेतकऱ्यास रानटी हत्तीने रस्त्यावर चिरडले 


गडचिरोली :
  आपल्या शेताची पाहणी करून सायकलने घराकडे येत असलेल्या शेतकऱ्यास रानटी हत्तीने डांबरी रस्त्यावर चिरडून ठार केले.
ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील मरेगाव गावाशेजारी २५ नोव्हेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

मनोज प्रभाकर येरमे (३८) रा. मरेगाव असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चांभार्डा व मरेगाव परिसरात गेल्या १० दिवसांपासून रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. यातच आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी मनोज येरमे हे शनिवारी सायंकाळी अन्य शेतकऱ्यांसह शेताकडे गेले होते. दरम्यान वडधा-मौशिखांब मार्गालगतच रानटी हत्तींचा कळप वावरत होता. याच वेळी येरमे हे सायकलने घराकडे परत येत असतानाच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला व डांबरी रस्त्यावरच त्यांना चिरडले. यात येरमे यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. चांभार्डा व मरेगाव भागात हत्तींनी गेल्या आठवडाभरापासून अक्षरशः धुडगूस घातला असून शेकडो शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

तीन महिन्यात रानटी हत्तीकडून तिसरा बळी

रानटी हत्तींनी गेल्या तीन महिन्यात तिघांचा बळी घेतला. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी आरमोरी तालुक्याच्या पळसगाव परिसरात सहायक वनसंरक्षकांचे वाहनचालक सुधाकर आत्राम यांना तर १७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील होमाजी गुरनुले या शेतकऱ्याला हत्तीने चिरडून ठार केले होते. त्यानंतर आता मरेगाव येथे मनोज येरमे यांना हत्तीने चिरडून ठार केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !