तीन चिडीमार तरुणांवर विनयभंग,पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल
गुन्हेगार कोणीही असो, गय केली जाणार नाही – वणी पोलीस
वणी:-
शहरात चिडीमारी, दादागिरी व टोळक्याने मिळून मारामारी ह्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. आता मुलींची छेडखानी सारख्या गंभीर घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहरालगत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुरुवारी एका तरुणासह त्याच्या दोन चिडीमार साथीदारांवर पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हा पदाधिकारी अफसर शेख यांचा मुलगा आहे. मात्र गुन्हेगार हा कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही असे वणी पोलीसांनी ठणकावून सांगितले आहे.
पिडीत बालिकेच्या तक्रारी वरून सोहेल अफसर शेख (२०),तेजस भगत (२१),व स्वप्नील चिंचोलकर यांच्या विरोधात वणी पोलिसांनी भादंवीच्या कलम ३५४,३५४ (डी)५०४,५०६ यासह सहकलम ११(४),१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
आरोपी हे अल्पवयीन मुलीची कधी भर रस्त्यात तर कधी तिच्या घरासमोर जोरजोरात ओरडून तिचं नाव घेऊन व अश्लील शब्द प्रयोग करून आरोपी हे तिला लज्जा येईल असे कृत्य करीत होते. याप्रकरणी आरोपींचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय.
सोहेल अफसर शेख(२०) रा. वणी या तरुणाने शहरालगत वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला प्रलोभनं व आमिषे दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. ती त्याच्या भूलथापांना बळी पडून त्याच्या प्रेमात पडली. दरम्यान तिला त्याचे इतरही मुलींशी प्रेमसंबंध असल्याचे कळले. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर झाली. मात्र सोहेल शेख हा तिच्यावर जबरन प्रेम लादण्याचा प्रयत्न करू लागला. तिला आपली टपोरीगिरी दाखवू लागला , तिला धमकावू लागला, तिच्या घरासमोर उभे राहून जोरजोरात ओरडणं, तिचं नाव घेऊन अश्लील शेरेबाजी करणं, ती घराबाहेर येताच तिची छेड काढणं, या त्याच्या टपोरीगिरीमुळे ती कमालीची धास्तावली होती. मुलीच्या आईने व बहिणीने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कोळसा व्यवसयीकाचा मुलगा तो कुणालाच जुमानत नव्हता. त्याच्या दादागिरीला व बदनामीच्या भीतीने तिने महाविद्यालयात जाणे बंद केले. मात्र त्यांनी तिला त्रास देणे बंद केले नाही. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ला सोहेल अफसर शेख, तेजस भगत व स्वप्नील चिंचोलकर हे तिघेही रात्री ११ वाजता मुलीच्या घरासमोर उभे राहून जोरजोरात तिचं नाव घेऊन आवाज देत होते. सोहेल शेख हा मुलीचं नाव घेऊन तिला शिवीगाळ करीत असतांना मुलीची आई व बहीण घराबाहेर आली, व त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र मस्तावलेल्या सोहेल ने दादागिरी दाखवून उलट त्यांनाच धमकावू लागला. तुम्ही जर पोलिसांत तक्रार केली तर तुमचं जगणं कठीण करेन असा दम त्याने मुलीच्या कुटुंबियांना दिला. त्यामुळे त्याच्यापासून धोका उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता मुलीने हिंमत करून सोहेल अफसर शेख(२०),तेजस भगत (२१) व स्वप्नील चिंचोलकर विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. मुलीची तक्रार दाखल होताच व तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसांनी ताबडतोब तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादंविच्या कलम ३५४,३५४(डी),५०४, ५०६ व सहकलम ११(चार), १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.
पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय/ दत्ता पेंडकर करीत आहे.

